लेखक राजीव साने यांची भूमिका
स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आहेत, पण समता हे मूल्यच नाही. एकच कायदा सर्वाना म्हणजेच नियम सार्वत्रिकता हा समतेचा अर्थ आहे. कोणाकडेही तुच्छतेने पाहता कामा नये. श्रेणीव्यवस्था ही सत्ताधारित नसावी तर ती गुणवत्ताधारित असली पाहिजे. संधीचे समानीकरण करणे अशक्य आहे. खेळामध्ये हार-जीत ही असतेच. त्यामध्ये समता कोठून आणणार, असा सवाल करीत स्वातंत्र्याचा बळी देऊन समता नको, अशी भूमिका प्रसिद्ध लेखक-तत्त्वचिंतक राजीव साने यांनी मांडली.
क्लॅरिटी फाउंडेशनतर्फे डॉ. अजय ब्रह्मनाळकर, निरंजन आगाशे आणि प्रा. संतोष शेवार यांनी साने यांची मुलाखत घेतली. मराठी भाषा, डावी चळवळ, अर्थकारण, जागतिकीकरण, हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता अशा विविध विषयांवरील प्रश्नांना साने यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
धर्मनिरपेक्षता धोक्यात आली हे खरे असले तरी हिंदूत्ववादी का फोफावले याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. जे धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात त्यांनी मध्य आणि निम्न जातींचा जमातवाद पोसला. अल्पसंख्य धर्मगुरूंचे धार्जिण्य केले. हिंदुत्ववाद्यांमध्ये असे अनेक लोक आहेत की जे सनातनी, पुराणमतवादी, जमातवादी, मनुवादी आणि मुस्लीमद्वेष्टे नाहीत, पण ते पक्षपाती इहवाद विरुद्ध निष्पक्षपाती इहवाद असा लढा देत आहेत. अशा हिंदूत्ववाद्यांनी हिंदूत्व शब्दाचा त्याग करून स्वत:ला निष्पक्षपाती इहवादी म्हणवून घ्यावे, असे मत साने यांनी व्यक्त केले. उजवा याचा अर्थ हिंदूत्ववादी नव्हे, तर जो स्वातंत्र्य, स्पर्धा, गुणवत्ता मानतो आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन समता नको असे स्पष्टपणे सांगतो तो उजवा. हिंदूत्ववाद्यांना उजवा हा शब्द लावणे हे उजवा या शब्दाचे दुर्दैव आहे. हिंदूंनी त्यांच्यातील समन्वयवाद, उदारता हा हिंदूपणा कायम ठेवावा. त्यामध्ये राजकारण आणू नये. हा साधेपणा घालवून त्यांना कडवे बनवणे हा देखील हिंदूत्ववाद्यांचा दोषच आहे. कामगार चळवळीमध्ये तुम्हाला घाटा होऊ न देता आम्हाला वाटा मिळाला पाहिजे असे वाटाघाटीचे सूत्र असले पाहिजे. न्याय आणि करुणा यात गल्लत करता कामा नये. विषमता ही अन्यायी असते म्हणजे समता न्यायी असतेच असे नाही. कधीकधी समता ही देखील अन्यायी असू शकते, असेही साने म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom and brotherhood has values says author rajiv sane
First published on: 07-06-2016 at 00:09 IST