लोणावळा या ठिकाणी असलेल्या कातळदरा भागात धबधबा आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही मित्र आले होते. त्यापैकी एका मित्राचा पाय जायबंदी झाला. तेव्हा आपल्या जखमी मित्राला सोबत घेऊन जाण्याऐवजी त्याला तसंच टाकून त्याचे मित्र पळाले. कातळदरा धबधबा जंगल भागात आहे. अशा ठिकाणी जखमी मित्राला तसंच टाकून त्याचे मित्र पळाले. प्रवीण ढोकळे असे या तरुणाचं नाव आहे. शिवदुर्ग टीमने मात्र प्रवीण ढोकळेला जंगलातून बाहेर काढले. जे मित्र प्रवीणसोबत आले होते त्यांनी प्रवीण जायबंदी झाल्यावर शिवदुर्ग टीमची आणि प्रवीणची भेट घडवली. त्यानंतर आपल्या घरी काढता पाय घेतला. एकही मित्र प्रवीणजवळ थांबला नाही अशी माहिती शिवदुर्ग टीमच्या सदस्यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की, काही तरुण तरुणी पर्यटक लोणावळ्यातील राजमाची, कातळदरा येथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. सर्व जण मुख्य रस्त्यापासून आत जंगलात गेले, सगळेच भटकंतीचा आनंद घेत होते. तेव्हा, प्रवीणला गंभीर इजा झाली आणि पाय जायबंदी झाला. मित्रांपैकी एकाने शिवदुर्ग टीमशी संपर्क करत संबंधित ठिकाणाची माहिती दिली. शिवदुर्ग टीम चे मुख्य सदस्य सुनील गायकवाड हे बाहेरगावी शोध मोहिमेसाठी गेले होते. त्यामुळे काही जणांची जमवाजमव करत ११ जणांची टीम तयार केली. तातडीने घटनास्थळी धाव घेत, राजमाची येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचले.

परिस्थिती अत्यंत वाईट होती पावसात पायवाट काढत संबंधित तरुणांपर्यंत शिवदुर्ग टीमची टीम पोहचली. मित्रांनी जखमी प्रवीण ची भेट घडवून काही जण आपापल्या घरी परतले. त्यांनी आपल्या मित्राला संकटात मदत न करता तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, १०३ किलो वजन असलेल्या प्रवीण ला अगोदर खांद्यावर हात ठेवून चालण्यास सांगितले. मात्र, त्याला जास्त वेदना होत असल्याने अखेर स्ट्रेचरवर झोपायला लावून काळोखात पायवाट काढत शिवदुर्ग टीम ने त्याला सुखरूप मुख्य रस्त्यावर आणले. पाऊस आणि निसरडा रस्त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात जे अंतर कापलं जातं ते कापण्यासाठी दोन तास लागले अशी माहिती शिवदुर्ग टीम ने दिली आहे. समीर जोशी, राहुल देशमुख, सागर कुंभार, अनिल सुतार, वैष्णवी भांगरे, सनी कडू, ओंकार पडवळ, अनिकेत आंबेकर, अंकुश महाडिक व आनंद गावडे असे बचाव कार्य करणाऱ्या शिवदुर्ग टीम च्या सदस्यांची नावे आहेत.