‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ च्या (मार्ड) संपात पुण्यातील निवासी डॉक्टर्स मात्र बुधवारपासून सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील नागरी रुग्णालयातील रुग्णांना एक दिवसाचा दिलासा मिळाला आहे.
सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करावी, पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर डॉक्टरांना दिला जाणारा नोकरीचा एक वर्षांचा बाँड लवकर अमलात आणला जावा आणि या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालय व रुग्णालयाच्या
वसतिगृहात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुण्यातील निवासी डॉक्टर्स मात्र या संपात बुधवारी सहभागी होत आहेत.
‘मार्ड’ चे पुण्यातील सरसचिव डॉ. शशिकांत स्वामी म्हणाले, ‘‘रुग्णांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने पुण्यातील निवासी डॉक्टर्स संपात एक दिवस उशिरा सहभागी होत आहेत. निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करून द्यायचे आश्वासन सरकारतर्फे तीन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. मात्र अजूनही त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक नागरी रुग्णालयात पोलीस चौकी असणे, रुग्णालयाचे वॉर्ड्स व अपघात कक्षात तसेच डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे.’’