सीईओ वर्ल्ड मॅगझिन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाकडून पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची (एफटीआयआय) दखल घेण्यात आली आहे. सीईओ वर्ल्ड मॅगझिनने जगातील सर्वोत्तम चित्रपट संस्थांच्या केलेल्या यादीत एफटीआआयने दहावे स्थान पटकावले आहे.
सीईओ वर्ल्ड मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या २०१९ मधील सर्वोत्तम चित्रपट प्रशिक्षण संस्थांमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा येथील संस्थांच्या बरोबरीने पहिल्या दहा संस्थांच्या पंक्तीत एफटीआयआयचा समावेश झाला आहे. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने चौदावे तर कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने बावीसावे स्थान मिळवले आहे. सीईओ वर्ल्ड मॅगझिन या जागतिक कीर्तीच्या मासिकाने दिलेल्या क्रमवारीत पहिल्या दहात समाविष्ट होणारी एफटीआयआय ही एकमेव आशियाई संस्था आहे. सीईओ वर्ल्ड मॅगझिनने ही दखल घेणे ही अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले.
सीईओ वर्ल्ड मॅगझिनच्या क्रमवारीत अमेरिकेतील यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स या संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. अमेरिकन फिल्म इन्स्टिटय़ूट, यूसीएलए स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अँड टेलिव्हिजन, कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ द आर्ट्स या अमेरिकेतील संस्थांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला आहे. ब्रिटनमधील नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूल ही संस्था पाचव्या तर अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अकादमी सहाव्या स्थानावर आहे. न्यूयॉर्कची एनवाययू टिश स्कूल ऑफ द आर्ट्स सातव्या तर कॅनडातील टोरांटो फिल्म स्कूल आठव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी फिल्म स्कूलने नववे स्थान मिळवले आहे.