चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे कट रचून खून करणाऱ्या पतीला पुण्याच्या वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी समीर जाधव याने पत्नी अंजलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर लोखंडी भट्टी तयार करून मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर भट्टीही नष्ट केली. अंजली खासगी शिक्षिका म्हणून काम करत होती. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला कारण खून केल्यानंतर आरोपी समीर जाधव, जो पेशाने फॅब्रिकेशनचे काम करतो, त्याने स्वतः पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. हे सगळं बिंग कसं फुटलं? काय घडलं जाणून घेऊ.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पाठवला तो मेसेज

समीर जाधव आणि अंजली या दोघांचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. शिवणे भागात दोघं मुलांसह राहात होते. मात्र चार वेळा दृश्यम सिनेमा पाहून समीरने अंजलीच्या हत्येचा कट आखला. तसंच खुनानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने अंजलीच्या मोबाइलवरुन आय लव्ह यू असा मेसेज मित्राला पाठवला. त्यानंतर त्या मेसेजचं उत्तरही त्यानेच दिलं. पत्नीचे अनैतिक संबंध आहेत असं त्याला भासवायचं होतं. त्यामुळे समीरने हे पाऊल उचललं. यामागे कारण होतं ते समीरच्या अनैतिक संबंधांचं. समीरचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. सुरुवातील पोलिसांना वाटलं होतं की समीरने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केली. पण चौकशी दरम्यान पोलिसांना कळलं की समीरने अनैतिक संबंध असल्याने आपल्या मार्गातून पत्नी अंजलीला दूर करण्यासाठी हे पाऊल उचललं.

पोलिसांनी जो तपास केला त्यात समीरचा बनाव उघड

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, तरीही तो पत्नी अंजली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शिवणे परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्याचे २०१७ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. खुनाच्या वेळी मुलं दिवाळीच्या सुट्टीमुळे गावाला गेली होती.

पूर्वनियोजित कट आखून समीरने अंजलीला संपवलं

समीरने पूर्वनियोजित कट रचला होता. त्याने खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. २६ ऑक्टोबरला तो चारचाकी गाडीतून पत्नीला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला. त्याच ठिकाणी त्याने अंजली यांचा गळा दाबून खून केला. मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने तिथेच एक लोखंडी भट्टी तयार केली आणि मृतदेह जाळला. मृतदेहाची राख जवळच्या ओढ्यातील नदीत फेकून दिली. मृतदेह जाळण्यापूर्वी समीरने ‘दृश्यम’ चित्रपट तीन ते चार वेळा पाहिल्याचे समोर आले आहे.