देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या आनंद सोहळ्याचा श्रीगणेशा सोमवारी प्राणप्रतिष्ठापनेने होणार आहे. विघ्नहर्त्यां गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी सुरू असलेली तयारी, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंगलमूर्तीना घरी आणण्यासाठीचा उत्साह, खरेदीची लगबग, सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांचे अंतिम टप्प्यात आलेले काम असे चित्र साऱ्या शहरभर होते.
गणरायाच्या मूर्ती पुणेकरांनी रविवारीच मोठय़ा उत्साहाने घरी नेल्या. गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी दिवसभर सर्वत्र सुरू होती. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकोलची मंदिरे, मखरे, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवार पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ येथे तोबा गर्दी झाली होती. यंदा गणपतीच्या छोटय़ा मूर्तीसाठी कोल्हापुरी पद्धतीचे, तसेच राजस्थानी बांधणीचे फेटे मोठय़ा प्रमाणावर बाजारात आले आहेत. त्यांचीही खरेदी जोरात सुरू होती.
गणेशपूजेसाठी लागणारे अत्तर, हळद, कुंकू, सुवासिक उदबत्त्या, कापूर, तसेच केवडा, कमळ, पत्री, तुळशी, सुवासिक फुले, दूर्वा, केळीचे खुंट यांनाही आज चांगली मागणी राहिली. मार्केट यार्डमधील फुलांचा बाजारही आज दिवसभर गर्दीने फुलला होता. मोठय़ा मागणीमुळे फुलांचे बाजारही तेजीत होते. सफरचंद, केळी आदी फळांनाही चांगली मागणी होती. प्रसादासाठी लागणारे साखरफुटाणे, पेढे, माव्याचे मोदक, आंब्याचे मोदक यांचीही उलाढाल लक्षणीय होती. याप्रमाणेच लाडक्या गणरायासाठी चांदीच्या अलंकारांची खरेदी करण्यासाठी सराफ दुकानांमध्ये गर्दी झाली होती.
——- मानाच्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना
पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि कसबा या मानाच्या पहिल्या गणरायाची प्रतिष्ठापना वेंकटरमण दीक्षित शास्त्रीमहाराज यांच्या हस्ते सकाळी ११.१६ वाजता होणार आहे. ग्रामदेवता आणि श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे. गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना उद्योजक ललित सिंघवी आणि आरती सिंघवी यांच्या हस्ते सकाळी ११.५५ वाजता होणार आहे. श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रतिष्ठापना सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता तर, श्री केसरीवाडा गणेशोत्सव ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ९.३० वाजता आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ७.३० वाजता श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदा मंडळाने चामुंडेश्वरी मंदिराची प्रतिकृती उभारली असून त्याच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. रवींद्र कसबेकर यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना होणार आहे.
——– पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर पोलीस दलाच्या आठ हजार कर्मचाऱ्यांशिवाय पाच उपायुक्त, २५ सहायक आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, २६० सहायक व उपनिरीक्षक बंदोबस्तास राहणार आहेत. त्याशिवाय पोलीस मित्र म्हणून सुमारे दहा हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही मागविण्यात आल्या आहेत.