गणेशोत्सव मंडळांची भर रस्त्यात सजावटीची कामे; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांची कामे थेट रस्त्यावर आणि रस्ते अडवूनच सुरू आहेत. रस्त्यावर सुरू असलेल्या या कामांमुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मित्र मंडळातर्फे जेजुरी येथील मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असून भरदिवसा रस्ता अडवून मंदिराची प्रतिकृती साकारत असलेले कलाकार, रस्त्याच्याकडेला लागलेल्या मोठय़ा क्रेन, यामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरातील भव्य देखावे आकर्षण ठरतात. देखावे पाहण्यासाठी मध्य भागात उत्सवाच्या काळात मोठया संख्येने नागरिक येतात. मात्र, मध्य भागातील बहुतांश मंडळांचे मांडव हे वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचे ठरतात. हे मांडव पंधरा दिवस आधीच टाकण्यात आले आहेत. रस्त्यावर पसरलेले बांबू आणि सजावटीच्या साहित्यामुळे मध्य भागात वाहतुकीची कोंडी होती. उत्सवाची सांगता झाल्यानंतरच मध्य भागातील वाहतूक सुरळीत होते. सजावटीचे काम आणि मांडवांच्या आकारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. भरदिवसा रस्ता अडवून सजावटीचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र सध्या मध्य भागात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.
सदाशिव पेठेतील चित्रशाळा चौकालगत शतकोत्तर परंपरा असलेल्या राजाराम मंडळाकडून सलग दुसऱ्या वर्षी भव्य मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. हुबेहुब प्रतिकृती साकारणाऱ्या या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी उत्सवाच्या काळात मोठी गर्दी होते. लाखो रुपये खर्चून साकारण्यात येत असलेल्या या प्रतिकृतीसाठी रस्ता व्यापण्यात आला आहे. मंडळाने रस्त्याच्या दुतर्फा भव्य कमानी उभारण्यासाठी खास क्रेन मागविली आहे. रस्त्याच्या कडेला ही क्रेन लावण्यात आली आहे. शनिवारी (२७ ऑगस्ट) मंडळाने सायंकाळी कमानी उभारण्याचे काम सुरू केले. त्यामुळे या भागात मोठी कोंडी झाली होती, असे स्थानिकांनी सांगितले.
महापालिका आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून मांडवांना परवानगी देण्यात येते. मध्य भागातील ज्या मंडळांचे मांडव वाहतुकीला अडथळा ठरणारे असतील, त्यांची पाहणी करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. सदाशिव पेठेतील मंडळाच्या संबंधित मांडवाची पाहणी करुन त्यासंदर्भात अहवाल पाठविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– सुधीर हिरेमठ, परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त