पुणे : वैमनस्यातून टोळक्याने कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात दहशत माजवून अल्पवयीन मुलांवर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल ऊर्फ गोटय़ा जाधव, राज जाधव, यश उभे (तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका अल्पवयीन मुलाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्या वेळी भांडणात मध्यस्थीसाठी आलेल्या रहिवाशांवर कोयता उगारून आरोपींनी दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास करत आहेत.

शहरात दहशतीच्या वाढत्या घटना

किरकोळ वादातून सामान्यांच्या वाहनांच्या तोडफोड तसेच दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. शहरातील गुंड टोळय़ांवर मोक्का कारवाई करण्यात आल्याने संघटित गुन्हेगारीला चाप बसला असला, तरी किरकोळ वाद, वैमनस्यातून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. शहराच्या मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात दहशतीचे वातावरण आहे. सहा दिवसांपूर्वी शिवणे परिसरातील एका सोसायटीत तळमजल्यावरील १५ दुचाकी पेटवून देण्यात आल्या होत्या.

कोंढव्यात वाहनांच्या काचा फोडल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने डीपी रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. याबाबत मल्हारी पवार (वय ५२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  शिवनेरीनगर गल्ली क्रमांक तीनच्या परिसरात दुचाकीवरून पाच ते सहा जण आले. टोळक्याकडे शस्त्रे होती. आमच्या नादाला लागू नका. जिवे मारू अशी धमकी परिसरातील रहिवाशांना दिली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविली. सहायक फौजदार असगर सय्यद तपास करत आहेत.