आसाम येथील फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अपहरण करून ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या तपास पथकास १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अल्ताफ हुसेन समशोर लष्कर (वय ४२, रा. आसाम) यांना अज्ञात आरोपींनी पळवून नेले व ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली. या प्रकरणी लष्कर यांचे बंधू इलतार समशोर लष्कर (वय २५) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात चिखलीतील स्पाइन रस्त्यावरून अपहरण झाल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अपहरण झालेल्या अल्ताफविरुद्ध आसाम येथील सिल्चर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. अपहरण झालेला आरोपी प्रथम कोल्हापूरला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, तेव्हा पोलीसपथक त्या ठिकाणी गेले. मात्र, त्याआधीच आरोपी तेथून निसटले. अपहरण झालेला इसम व संशयित आरोपी बेंगलोरला गेल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा व निगडी पोलीस ठाण्याची दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून बेंगलोरला पाठवण्यात आली. तेथे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन २० ठिकाणी छापे घालण्यात आले. अखेर, अम्रुलहक मेहराबअली मजुमदार (वय ३५), अबुलहुसेन मकबीर लष्कर (वय ३०), अजमल हुसेन रफीकउद्दीन रेहमान लष्कर (वय ३१, सर्व राहणार जिल्हा कचर, आसाम) हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले.
पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले, सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकात पी. व्ही. भोसले, मधुकर पवार, जावेद पठाण, महादेव जावळे, बी. के. बोऱ्हाडे यांचा समावेश होता.