महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ 16shyam-manoharसामाजिक कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे १९९४ पासून साहित्यक्षेत्रातील व्यक्तींना, तर १९९६ पासून सामाजिक कार्यक्षेत्रातील व्यक्ती किंवा संस्थांना पुरस्कार दिले जात आहेत. पूर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे केले जात होते. गेल्या सहा वर्षांपासून साधना ट्रस्टतर्फे या पुरस्कारांचे संयोजन केले जात आहे, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
फाऊंडेशनतर्फे महाबळेश्वर सैल यांच्या ‘तांडव’ या कादंबरीला विशेष ग्रंथ पुरस्कार, अरुण खोपकर यांच्या ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत चित्रव्यूह’ या जोडपुस्तकासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, किरण गुरव यांच्या ‘राखीव खेळ सावल्यांचा’ कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार आणि हिमांशू स्मार्त यांच्या ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाटय़लेखनासाठी रा. शं. दातार नाटय़ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. तीन कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रमेश गावस यांना प्रबोधनासाठी, मनीषा तोकले यांना असंघटित कष्टकरी क्षेत्रासाठी, तर िबदुमाधव खिरे यांना सामाजिक प्रश्न विभागासाठी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे १० जानेवारी रोजी दोन टप्प्यांमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अन्य पुरस्कारविजेत्यांच्या मुलाखती होणार असून सायंकाळी पाच वाजता जीवनगौरव पुरस्कारविजेते, डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कारविजेते, अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होणार आहे.
प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्ष असलेल्या ग्रंथ निवड समितीमध्ये डॉ. अरुणा ढेरे, अवधूत परळकर, मनोहर जाधव आणि दासू वैद्य यांचा, तर विजया चौहान अध्यक्ष असलेल्या कार्यकर्ता निवड समितीमध्ये शेखर सोनाळकर, माधव बावगे आणि साधना दधिच यांचा समावेश होता. अमेरिकेतील निवड समितीमध्ये सुनील देशमुख, विद्युल्लेखा अकलूजकर, दिलीप वि. चित्रे आणि रजनी शेंदूरे हे सदस्य होते.