मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये पुणे शहरात गृहखरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणीतून स्पष्ट होत असताना ढेपाळलेल्या या गृहखरेदीला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पाश्र्वभूमीवर क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने ‘घर खरेदी उत्सव’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून गृहखरेदीसाठी नागरिकांना आकर्षित करण्यात येत आहे. यंदा या प्रदर्शनामध्ये गृहप्रकल्पांची संख्या वाढली असून, ती एक हजाराहून अधिक आहे. त्यातून मागणी असलेले ठराविक भाग वगळता इतर ठिकाणच्या प्रकल्पात राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी गृहखरेदी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पुण्यातील काही ठराविक भागातील बांधकाम प्रकल्प वगळता इतर ठिकाणच्या प्रकल्पातील मोठय़ा प्रमाणावरील सदनिकांना मागणी नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पुण्यातच नव्हे, तर राज्यातही काहीशी अशीच स्थिती असल्याचे यंदा कमी झालेल्या दस्त नोंदणीतून स्पष्ट झाले आहे. सदनिकांना मागणी नसल्याने ‘रेडी रेकनर’च्या (वार्षिक बाजार मूल्य) दरांमध्ये वाढ न करण्याची मागणी बांधकाम व्यावासयिकांनी शासनाकडे केली होती. त्याचा परिणाम म्हणून दर जानेवारीला वाढविल्या जाणाऱ्या रेडी रेकनरच्या दरांना तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. नवीव दर ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील या सर्व पाश्र्वभूमीवर यंदा क्रेडाईचे ‘घर खरेदी उत्सव’ हे प्रदर्शन होणार आहे. त्या माध्यमातून गृहखरेदीला चालना देण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मागील वर्षी या प्रकल्पामध्ये सुमारे शंभर विकसक व तीनशेहून अधिक प्रकल्पांचा समावेश होता. मात्र, यंदा त्यामध्ये एक हजाराहून अधिक प्रकल्पांचा समावेश आहे. १५ ते १७ जानेवारी या कालावधीत एसएसपीएमएस मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. १२० विकसक आपले प्रकल्प त्यामध्ये सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे देशभरातील विविध बँकांचाही या प्रदर्शनात महत्त्वाचा सहभाग असणार आहे. सदनिका, जमिनी, दुकाने, कार्यालय व बंगले आदी विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेला समावेश. त्याचप्रमाणे भविष्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून शहर व लगतच्या परिसराचा होणारा एकत्रित विकास आदींसह जुन्याच रेडी रेकनरच्या दरामुळे नागरिकांचा होणारा फायदा, या सर्व गोष्टींमधून गृहखरेदीला चांगला प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, बांधकाम व्यावसायिकही याच बाबींच्या आधारावर गृहखरेदी वाढण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मागील काही वर्षांत पुणे शहर झपाटय़ाने वाढले आहे. पुढेही शहरीकरण वाढतच जाणार आहे. त्यामुळे गृहखरेदी होतच राहणार आहे. बांधकाम क्षेत्रात मंदी किंवा घरांची दरवाढ, ही मानसिकता नागरिकांनी केली आहे. गृहखरेदी व त्यातील गुंतवणुकीबाबत इच्छाशक्ती कमी आहे. कामाचे ठिकाण व आवश्यक गरजा पूर्ण करणाऱ्या ठिकाणातील प्रकल्पांना मागणी आहे. मात्र, इतर ठिकाणीही भविष्यातील विकास लक्षात घेऊन गृहखरेदी झाल्यास त्यात नागरिकांनाच फायदा आहे. त्यास उशीर होईल, तसतसा नागरिकांचाच फटका बसू शकतो.’’
– अतुल गोयल, क्रेडाई

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghar kharedi utsav by credai
First published on: 12-01-2016 at 03:25 IST