उणे ४० अंशांचे गोठवणारे तापमान..हिममिश्रित बोचरा वारा..पाणी पिण्यासारखे लहानसे कामही जिकिरीचे झाल्यामुळे झालेली चिडचिड..मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर गेल्या वेळच्या चकवा दिलेल्या आठवणी..नेत्याचा त्याग, या साऱ्यातून ‘त्यां’नी गळ्यात गळे घालूनच एव्हरेस्टवर पहिले पाऊल टाकले! ‘गिरीप्रेमी’च्या एव्हरेस्टवीरांनी एव्हरेस्ट-ल्होत्से मोहिमेचा थरार उलगडला.
नुकतीच एव्हरेस्ट आणि ल्होत्से अशी दुहेरी मोहीम यशस्वी करून परतलेल्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला भेट दिली. मोहिमेचे नेतृत्व केलेले उमेश झिरपे, ‘ल्होत्से’ची अवघड चढाई एकटय़ाने पूर्ण केलेला आशिष माने आणि एव्हरेस्टवीर गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे यांनी आपल्या चित्तथरारक आठवणी सांगितल्या.
मोहिमेची पाश्र्वभूमी उमेश झिरपे यांनी सांगितल्यानंतर चढाईपासूनच्या आठवणी सांगण्यास त्यांनी सुरूवात केली. ‘मार्ग माहिती असेल तर चढाई रात्रीच सुरू करतात. रात्री बर्फ कडक असतो, ऊन नसल्यामुळे ‘डीहायड्रेशन’चा धोकाही नसतो. पण रात्री तापमान खूपच कमी होत असल्यामुळे हात-पाय गोठतात. रात्र संपतानाचे २-३ तास ‘कधी एकदा सूर्य दिसतो’, अशा विचारात जायचे. अंगावर पडणारे सूर्याचे पहिले किरण मात्र पुन्हा ताजेतवाने करत! उंचीवर वारा प्रचंड असल्यामुळे तंबू उडून जातील की काय इतके फडफडायचे. वाऱ्याच्या आवाजामुळे एकमेकांशी जवळून बोललेलेही ऐकू यायचे नाही. चढाई करताना तर पुष्कळदा ‘ऑक्सिजन मास्क’मुळे खाणाखुणांवरच भागवावे लागत असे. तापमान उणे चाळीस अंश असल्यामुळे थर्मासमधील गरम पाणी प्यावे लागत असे. साधे पाणी प्यायलाही खूप कष्ट घ्यावे लागत, एकमेकांवर चिडचिडही होई!’..गणेश, आनंद आणि भूषण सांगत होते.
मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात ऐनवेळी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे उमेश झिरपे यांनी मोठेपणा दाखवून माघार घेतली होती. गणेश, आनंद आणि भूषणचे ‘समीट’ व्हावे यासाठी उमेश यांनी घेतलेला निर्णय या तिघांवरचे दडपण वाढवणारा होता. याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘‘आधीच्या वर्षी समीट झाले नव्हते. या वर्षी ते व्हायलाच हवे याचे दडपण होते. गेल्या वर्षी मोहिमेचे जे टप्पे खडतर वाटले होते त्या टप्प्यांवर त्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. त्यातच उमेश यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दडपणात भर पडली. पण ‘आता कोणत्याही परिस्थितीत समीट व्हायलाच हवे’, अशी प्रेरणाही मिळाली! मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात आमच्या तिघांपैकी एखादा मागे पडला तरी बाकीच्या दोघांनी त्याच्यासाठी थांबायचे आणि सगळ्यांनी एकदमच शिखरावर पहिले पाऊल टाकायचे असे ठरवले होते. जेव्हा आम्ही अक्षरश: गळ्यात गळे घालून एव्हरेस्टवर पाऊल टाकले तो क्षण थरारून टाकणारा होता!’’
ल्होत्से शिखर सर करताना आशिष एकटा होता. खडतर परिस्थितीत प्रत्येक निर्णय एकटय़ाने घेताना काही वेळा मनाचा उडालेला गोंधळ त्याने सांगितला. ल्होत्से मोहिमेच्या एका टप्प्यात तर एका रशियन गिर्यारोहकाच्या मृतदेहाबरोबर असलेल्या दोरीचा उपयोग आशिषला करावा लागला होता. त्या वेळी त्या मृतदेहालाच केलेला नमस्कार आणि नंतर त्या दोरीच्या साहाय्याने सर केलेला मोहिमेचा रोमांचक टप्पा आशिषने उलगडवला.
‘गिरिप्रेमी’तर्फे पुढील वर्षी ‘माऊंट मकालू’ हे आठ हजार मीटर उंचीवरील शिखर मोहिमेसाठी निश्चित केले असल्याचे झिरपे यांनी सांगितले.