महानगरांपुढे अनेक प्रश्न उभे राहात आहेत आणि ते कायद्याच्या चौकटीत सोडवण्याचे आव्हान नगर प्रशासनापुढे आहे. अशा वेळी एफएसआय देण्यासारखे निर्णय घेताना चुका झाल्या तर त्याचे कायमस्वरूपी परिणाम शहराला भोगावे लागतील. यासाठी अशा चुका होऊ न देणे हे काम नगरसेवकांनी करावे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
पुणे महापालिकेत १९५२ पासून आतापर्यंत उपमहापौरपद भूषविलेल्या चोपन्न उपमहापौरांच्या सत्काराचा कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी आयोजित करण्यात आला होता. उपमहापौरांना यावेळी लोकसखा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी चव्हाण बोलत होते. उपमहापौर आबा बागूल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाषणाच्या प्रारंभीच एका संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल चव्हाण यांनी बागूल यांचे कौतुक केले. बागूल यांनी सर्व उपमहापौरांशी, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून कार्यक्रम उत्साहात घडवून आणला असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या आज नागरी भागात राहात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक, स्वस्त घरे यासह अनेक प्रश्न शहरांपुढे निर्माण होत आहेत आणि त्याचे सर्वात मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. पूर्वीची प्रशासकीय म्हणजे महसूल यंत्रणा ग्रामीण भाग डोळ्यापुढे ठेवून तयार केलेली होती. त्यात आता खूप बदल करावे लागतील, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
नागरीकरणामुळे उभी राहात असलेली आव्हाने सोडवण्याचे काम तुम्ही नगरसेवक करता. महानगरापुढे जे प्रश्न उभे राहात आहेत ते सोडवण्याचे आव्हान आता नागरी प्रशासनापुढे आहे. अशावेळी एफएसआय देण्यासारखे निर्णय घेण्यात चुका झाल्या तर त्याचे परिणाम कायमस्वरूपी भोगावे लागतील. ते होऊ न देण्याचे काम आपण करावे, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.
पुणे महापालिकेला कौटुंबिक वारसा आहे आणि हा पुण्याचा ठेवा आहे. त्यातूनच आगळा-वेगळा कार्यक्रम घडून येत असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. कार्यक्रमात सर्व उपमहापौरांची ओळख करून देणारी चित्रफीत दाखवण्यात आली तसेच उपमहापौरांना सत्कारात फेटा, शाल आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, विश्वजित कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शंकरराव तोडकर, डॉ. सतीश देसाई, दीपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमहापौर, संयोजक आबा बागूल यांनी प्रास्ताविक आणि गोपाळ तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giving fsi dont commit mistake prithviraj chavan
First published on: 22-02-2015 at 02:45 IST