भोसरीतील स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ दत्तात्रय फुगे यांची गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिघीमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केल्याचीही माहिती समोर आली आहे. चिटफंड घोटाळ्यातून दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दत्तात्रय फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे ‘गोल्डमॅन’ म्हणून ते चर्चेत होते. दत्तात्रय फुगे यांनी सुमारे ३ किलो २०० ग्रॅम सोन्याचे शर्ट तयार करून घेतले होते. सोन्याचा शर्ट आणि दागिन्यांनी नटलेले त्यांचे छायाचित्र चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या शर्टाची किंमत जवळपास १ कोटी २७ लाख इतकी होती. दरम्यान, फुगे यांच्यावर सात टक्के दराने गुंतवणुकीवर जाता परताव्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल होता.
वाचा: आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ‘गोल्डमॅन’विरुद्ध गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फुगे यांना गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर नेले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून दिघी येथील भारतमातानगर येथे दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, तातडीने चौकशी सुरू केली. याप्रकरणी पहाटे चार जणांना अटक केल्याचेही समजते.