सुस्थितीतील रस्त्यांची खोदाई करण्याचा धडाका; आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आटापिटा

शहरातील सुस्थितीतील रस्त्यांची खोदाई करून ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा धडाका सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांतील नगरसेवकांनी सुरू केला आहे. त्यामुळे प्रभागांमधील गल्लीबोळातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे वेगात सुरु झाली आहेत. विशेष म्हणजे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे काँक्रिटीकरण करण्यास विरोध असतानाही केवळ ‘आश्वासनां’ची पूर्तता करण्यासाठीच काँक्रिटीकरणाचा घाट घातला जात आहे. येत्या काही दिवसांत शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार आहे.

अलीकडच्या काळात शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा प्रकार सर्रास सुरु होता. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकारच्या सत्ताकाळात तर शहरात मोठय़ा संख्यने या प्रकारचे रस्ते करण्यात आले. त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर पावसाळी गटारांसाठी जागा निर्माण करणे अडचणीचे ठरत असल्याचे चित्र पुढे आले होते. पावसाळ्यात त्याचे दृश्य परिणामही पुढे आले होते. त्यामुळे यापुढे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना मान्यता देण्यात येणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र नव्यानेच सत्ता मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळातही हाच प्रकार सुरु झाल्याचे चित्र आहे. प्रभागांमधील प्रमुख रस्ते, उपरस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यात आले असून यातील काही ठिकाणी तर कामेही सुरु झाली आहेत. विशेष म्हणजे सुस्थितीतील रस्तेही त्यासाठी उखडण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात या प्रकारामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी नव्याने रस्ते खोदाई सुरु झाली आहे. येत्या मार्च अखेपर्यंत म्हणजे पुढील पाच महिन्यात जवळपास शंभर किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होण्याची शक्यता महापालिकेच्या पथ विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांची दुरवस्था हा नेहमीचा प्रश्न राहिला आहे. त्यातच विविध कारणांमुळे शहरात येत्या काही दिवसांमध्ये जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई होणार आहे. खासगी मोबाईल कंपन्या, शासकीय यंत्रणांबरोबरच महापालिकेकडूनही ही खोदाई होणार आहे. त्यामुळे शहर खड्डय़ात जाणार असतानाच सुस्थितीतील रस्ते उखडण्यात आल्यामुळे खड्डय़ांच्या समस्येत भर पडणार आहे.

रस्ते कितीवेळा उखडणार ?

महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेचे काम तीन टप्प्यात होणार असून संपूर्ण शहरात सोळाशे किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पुन्हा रस्ते खोदाई करावी लागणार असल्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनाही त्याची झळ बसणार आहे. रस्ते सातत्याने खोदणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याशिवाय या रस्त्यांवर केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरूही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.