शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करीत पुणेकरांनी कोणत्याही रस्त्यावर वाहनांसाठी शुल्क न भरण्याचे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे.
मूठभर राजकीय मंडळी वगळता पुणेकरांचा या योजनेस तीव्र विरोध असल्याने नागरिकांच्या भावनांची कदर न करता स्थायी समितीने ही योजना मंजुरीसाठी मुख्य सभेकडे पाठवून जनतेची दिशाभूल केली आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो याचे हे उदाहरण असल्याची टीका ग्राहक पंचायतीचे विलास लेले आणि ठकसेन पोरे यांनी केली आहे. पे अँड पार्क योजनेमुळे वाहनचालकांना कोणतीही नवीन सोय उपलब्ध होणार नाही. वाहतूक समस्या कमी होणार नसून उलट प्रमुख रस्त्यांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांवर चौपट वाहतूक कोंडी होणार आहे. पे अँड पार्क योजनेतून वाहनचालकांचे आर्थिक शोषण होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.