scorecardresearch

गुंजवणी बंद जलवाहिनीचे काम जोरात, सात किलोमीटर भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण

थेट जलवाहिनीतून तब्बल २१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाच्या देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी गुंजवणी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जोरात सुरू झाले आहे.

गुंजवणी बंद जलवाहिनीचे काम जोरात, सात किलोमीटर भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे : थेट जलवाहिनीतून तब्बल २१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाच्या देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी गुंजवणी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जोरात सुरू झाले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिका, करोनामध्ये बंद पडलेले काम, अशा विविध समस्यांमधून मार्ग काढत भूमिगत जलवाहिन्या जोडणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरण करणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या कामात सात किलोमीटर भूमिगत जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित जलवाहिन्या जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांना थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरित करणारा गुंजवणी प्रकल्प केंंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे.

हेही वाचा – दारू मागितल्याने महिलेचा खून, तरुणासह अल्पवयीन साथीदार ताब्यात

गुंजवणी प्रकल्पाची क्षमता ४.१७ अब्ज घनफूट (टीएमसी) असून त्याद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्यांमधील २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षभर २४ तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रतिशेतकरी सहा एकरी पाणी, असा निकष ठरवून पाणी वितरित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाद्वारे ८३.७०० कि.मी. लांबीची बंद वाहिनी डावा कालवा आणि २०.३७८ कि.मी. लांबीचा उजवा कालवा करण्यात येणार आहे. त्याद्वारे वेल्हे तालुक्यातील ८५० हे., भोरमधील ९५३५ हे. आणि पुरंदर तालुक्यातील ११ हजार १०७ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी आवश्यक जलवाहिन्या तयार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यात आल्या. तसेच, बृहत आराखडयानुसार आतापर्यंत सात कि.मी. भूमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत जलवाहिन्या असल्याने मोठे उत्खनन करावे लागते. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून काम सुरू आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

नेमका प्रकल्प काय?

बंद जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने पाणीचोरी, बाष्पीभवन, गळती आणि दूषित पाणी याला पूर्णपणे आळा बसणार आहे. परिणामी पाणीबचत होऊन प्रकल्पाची कार्यक्षमता वाढणार आहे. कोणताही वीज अथवा पंप न वापरता पाणी वितरण व्यवस्था करण्यात आल्याने आर्थिक खर्च कमी होणार आहे. पाणी वितरणासाठी धरणातील पाण्याच्या दाबाचा उपयोग करण्यात आल्याने सूक्ष्म सिंचनाचे धरण ते तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी देणे शक्य आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:34 IST

संबंधित बातम्या