गुटखा आणि पान मसाल्यावरील बंदीला आज एक वर्ष पूर्ण होत असून या एका वर्षांत केवळ पुणे जिल्ह्य़ात तब्बल दोन कोटी सोळा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षी २० जुलैपासून गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी अमलात आणली. त्यामुळे वर्षभर प्रशासनातर्फे गुटख्याच्या जप्तीची कडक मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेत पुणे जिल्ह्य़ात एकूण ९८ ठिकाणी जप्ती धाडी टाकण्यात आल्या असून त्यात सदतीस टनांहून अधिक गुटखा पकडण्यात आला आहे. या गुटख्याची एकूण किंमत तब्बल २ कोटी १६ लाख रुपये आहे.
पुण्यातील मोठे छापे-
– सप्टेंबर २०१२   (बालेवाडी)      किंमत- ६० लाख ६० हजार रुपये
– सप्टेंबर २०१२   (कुरूली गाव)   किंमत- ३० लाख रुपये
– जुलै २०१३       (मांजरी)        किंमत- १८ लाख ६० हजार रुपये
गुटख्यापासून वीजनिर्मिती!
पकडलेला गुटखा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पात पाठवला जात असल्याचे अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. रामटेकडी येथील ‘रोकेम ग्रीन एनर्जी प्रा. लि.’ कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात गुटखा कचऱ्याबरोबर क्रश करून त्यापासून वीजनिर्मिती करण्याची सोय उपलब्ध आहे.