पुणे : ‘अलंकापुरी माहात्म्य’ कथन करणारे सदाशिवलिखित १३० वर्षांपूर्वीच्या ‘ज्ञानलीलामृत’ या ओवीबद्ध हस्तलिखिताची दुर्मीळ प्रत नुकतीच उजेडात आली आहे. या ग्रंथाचे एकूण १८ अध्याय असून, हस्तलिखित २५२ पृष्ठांचे आहे. या दुर्मीळ ग्रंथाचे अद्याप प्रकाशन झाले नसल्याने भाविकांना या ग्रंथाविषयी माहिती नाही.

‘ज्ञानलीलामृत’ हे दुर्मीळ मराठी हस्तलिखित केंद्राकडे नुकतेच आले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि दुर्मीळ हस्तलिखितांचे अभ्यासक-संग्राहक वा. ल. मंजूळ यांनी या हस्तलिखिताचे महत्त्व सांगितले. आळंदी येथे सोमवारी (१७ नोव्हेंबर) श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव साजरा होत असताना या दुर्मीळ हस्तलिखिताचा परिचय मंजूळ यांनी करून दिला.

मंजूळ म्हणाले, ‘ज्ञानलीलामृत’ या हस्तलिखिताचे मूळ स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील ६४ व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादातून मांडले गेले आहे. यामध्ये श्रीक्षेत्र आळंदीचा पूर्वेतिहास, ज्ञानदेवांसह भावंडांची चरित्रे संस्कृतमधून मांडली गेली आहेत. या ग्रंथाचे शके १८१७ म्हणजेच १८९५ मध्ये ‘ज्ञानलीलामृत’ नावाने मराठीकरण करण्यात आले. त्याचा लेखक ‘सदाशिव’ असा उल्लेख ग्रंथात करण्यात आला आहे. सदाशिव हा मूळचा संत ज्ञानदेवकालीन अंतोबा कुलकर्णी यांच्या वंशातील आहे. ज्ञानदेव समाधीत प्रवेश करताना अंतोबांनी त्यांचा हात आपल्या मस्तकी ठेवून त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. नंतरच्या काळात आळंदी क्षेत्री अंतोबांचे वंशज नांदत असल्याची नोंद आजही वंशपरंपरागत प्रत्यक्ष स्वरूपात पाहावयास मिळते.’

‘ज्ञानलीलामृत’ हस्तलिखिताची वैशिष्ट्ये

  • सदाशिवलिखित दुर्मीळ हस्तलिखिताचे एकूण १८ अध्याय
  • शके १८१७ म्हणजेच इसवी सन १८९५ मधील ओवीबद्ध हस्तलिखित
  • हस्तलिखित २५२ पृष्ठांचे
  • प्रकाशनाअभावी हा दुर्मीळ ग्रंथ अद्यापही अपरिचित

‘ज्ञानलीलामृत’ हस्तलिखिताचे महत्त्व

‘ज्ञानलीलामृत’ या ओवीबद्ध हस्तलिखिताच्या दुर्मीळ प्रतीच्या आधारे अलंकापुरी माहात्म्यावर नवा प्रकाश पडणार आहे. श्री क्षेत्र आळंदी हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्यक्षेत्र असल्याने माऊली भक्तांसाठी ‘ज्ञानलीलामृत’ हस्तलिखिताविषयी औत्युक्य निर्माण होणार आहे. प्रकाशन झाले नसल्याने हा दुर्मीळ ग्रंथ अभ्यासक, संशोधक आणि वारकरी संप्रदायासाठी अजूनही अपरिचित असाच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव सोमवारी (१७ नोव्हेंबर) आळंदी येथे साजरा होत असताना या दुर्मीळ ओवीबद्ध हस्तलिखित प्रतीचा शोध लागला असल्याने सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल. या प्रतीवरील हस्तलिखिताचा नमुना जणू छपाई मुद्रणासारखा असल्याने हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरला आहे.