केवळ अक्षरांना जोडून लिहिले की शब्द तयार होतो. पण, त्या अक्षरांना वळणदार करणे ही एक कला आहे. डोळ्यांना आनंद देणारे सुलेखन आणि सुबक हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीची ‘स्तुती’ होते. प्रसिद्ध चित्रकार मिलिंद फडके यांनी सुलेखन आणि सुबक हस्तलिखिताच्या माध्यमातून गायिलेली ‘स्तुती’ बुधवारपासून (२७ जानेवारी) पुणेकरांना पाहता येणार आहे.
सुलेखनाबरोबरच मिलिंद फडके यांनी चितारलेल्या जलरंगातील चित्रांचाही या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. पत्रकारनगर रस्त्यावरील कलाछाया संस्थेच्या दर्पण आर्ट गॅलरी येथे येत्या २ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
आपल्या संपर्कातील प्रत्येकाकडे चांगले गुण आहेत. त्यांच्या स्वभावामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. आपण त्यांचा शोध घ्यावा. आपली गुणग्राहकता वाढवावी. गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना त्यांची ‘स्तुती’ करावी, ही या प्रदर्शनामागची भूमिका असल्याचे मिलिंद फडके यांनी सांगितले. स्तुती करावी असे मनात आल्यानंतर विचार करायला लागलो तेव्हा आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. या स्तुतीला किती रंग, किती छटा आणि किती पदर असावेत हेही ध्यानात आले. आपल्यालाही कुणाला मनापासून छान म्हणताना त्यात काय सामावले आहे हे पाहून कदाचित आनंदाचा दुर्मिळ ठेवा सापडेल, असेही फडके यांनी सांगितले.