‘आत्मक्लेश करण्याची वेळ माझ्यावर येणार नाही’
सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाने महाराष्ट्राची नवी ओळख करून देणाऱ्यांनी सहकारी संस्था कशा चालवायच्या हे मला शिकवू नये. माझ्यावर आत्मक्लेश करायची कधी वेळ आली नाही आणि येणारही नाही. अजित पवारांच्या गोष्टींमुळे राज्यात आघाडी सरकारला फटका बसला आहे, असा घणाघाती आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात केला.
इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीप्रणीत पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. मागील आठवडय़ात अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार पाटील यांनी शुक्रवारी जाहीर भाषणात घेतला. पाटील यांनी प्रथमच अजित पवार यांचे थेट नाव घेत टीकास्त्र सोडले.
पाटील म्हणाले, ऐन दुष्काळात जनता पाण्यासाठी तडफडत असताना धरणे कशी भरायची हे अजित पवारांनी इंदापूर तालुक्यातील लाकडी निबोडीत दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही मदत केली, हेही मंडळी विसरली आहे. जरंडेश्वरचा साखर कारखाना एकशे वीस कोटी रुपयांचा आहे. तो अजित पवार यांनी किती रुपयांना घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्य सहकारी बँक बरखास्त केली म्हणून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रपंच वाचले. अजित पवार यांच्यासारख्या सहकारी संस्था आम्ही दुसऱ्याला चालवायला देत नाही. मी सहकारी साखर कारखाने निर्माण करणाऱ्या शंकरराव पाटील यांचा पुतण्या आहे, असेही ते म्हणाले.