‘हे राम… नथुराम’ या नाटकाचा प्रयोग आज पुण्यातील बिबवेवाडी भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आला होता. या प्रयोगाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. शिवसेनेने मात्र या प्रयोगाला पाठिंबा देत या प्रयोगाचे समर्थन देखील केले आहे. या नाटकाचे निर्माते, अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, ‘या नाटकाचे आजपर्यंत ५२ हून अधिक राज्यभरात प्रयोग झाले त्यावेळी या कलाकृतीला विरोध झाला नाही. पण आता मात्र या नाटकाला विरोध केला जात आहे.’ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विरोध केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

राज्यातील विविध भागात हे राम नथुराम यांच्या प्रयोगाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये रसिक प्रेक्षकांना प्रयोग दाखविले जात आहे. आज पुण्यातदेखील हीच परिस्थिती निर्माण झाल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. या प्रयोगाला शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रयोगदेखील पाहिला.

nathuram-new

या विषयी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका संगिता तिवारी म्हणाल्या की, राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी देशाच्या इतिहासात फार मोठे योगदान दिले आहे. हे राम नथुराम या नाटकातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध असून पुण्यात या पुढील काळात होणाऱ्या प्रयोगालादेखील विरोध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींची ज्या व्यक्तीने हत्या केली त्यांचे समर्थन केले जाते ही अंत्यत निंदनीय बाब असून यातून भाजप सरकार आणि आरएसएस शरद पोंक्षेकडून चुकीचा इतिहास दाखविला जात आहे. त्यामुळे या नाटकाचे हे प्रयोग थांबविले पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचे माजी नगरसेवक शाम देशपांडे म्हणाले की, मागील काही दिवसापूर्वी संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काहींनी काढून टाकला. यातूनच त्यांची विकृती दिसून येते. त्यामुळे ज्या प्रकारे आज हे रामच्या प्रयोगाला काही संघटनांकडून विरोध केला जात आहे ही चुकीची बाब असून एकदा का नाटकाला सेन्सार बोर्डाने मंजुरी दिली असता, अशा प्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.