दुचाकीवरून येऊन सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चोरांनी उच्छाद मांडलेला असतानाच थेरगाव येथील आदित्य बिर्ला रूग्णालयात घडलेल्या चोरीच्या एका प्रकरणाने सर्व जण चक्रावून गेले आहेत. एका विवाहित रूग्ण महिलेला डॉक्टर म्हणून आलेल्या चोराने इंजेक्शन द्यायचे म्हणून दागिने काढायला लावले आणि मानेत सुई ठेवून ती न काढताच त्याने दागिन्यांसह पोबारा केला.
आदित्य बिर्ला रूग्णालयात ही महिला १७ मेला उपचारासाठी दाखल झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या वेशात एक इसम आला. तुम्हाला थोडय़ा वेळात इंजेक्शन द्यायचे आहे, दागिने काढून उशाखाली ठेवा, असे सांगितले. त्यानुसार, थोडय़ा वेळाने तो इंजेकशन देण्यासाठी आला. रूग्ण महिलेला एका कुशीवर झोपण्यास सांगितले. तिने कूस बदलल्यानंतर हातचलाखी करत उशीखाली ठेवलेले दागिने त्याने ताब्यात घेतले. तिला मानेत सुई टोचली, मात्र ती काढलीच नाही व त्याने पोबारा केला. तशाच अवस्थेत थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर त्या महिलेने नर्सला आवाज दिला व त्रास होत असल्याचे सांगितले. नर्सने सुई काढली. तेव्हा उशाखाली ठेवलेले दागिने जागेवर नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा सुरू केला. मात्र रूग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर महिलेने पोलिसांना हा प्रकार सांगितला. यासंदर्भात, रूग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी घडलेल्या प्रकाराला दुजोरा दिला. मात्र, महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून ते तपास करत आहेत व रूग्णालयाकडून पूर्ण सहकार्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पाटील यांनी सांगितले, की दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. यामध्ये २२ ग्रॅम सोने चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार चौकशी सुरू असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
डॉक्टरच्या वेशात येऊन रुग्ण महिलेचे दागिने पळवले
एका विवाहित रूग्ण महिलेला डॉक्टर म्हणून आलेल्या चोराने इंजेक्शन द्यायचे म्हणून दागिने काढायला लावले आणि मानेत सुई ठेवून ती न काढताच त्याने दागिन्यांसह पोबारा केला.
First published on: 21-05-2013 at 01:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He is not doctor but the roberer robbery of lady patients jewellery