पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या ३१८ हरकतींवर बुधवारी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बुधवारी दुपारी एक ते साडेचार या दरम्यान सुनावणी प्रक्रिया पार पडली. शासनाने नेमलेले अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान फक्त हरकतदारालाच सभागृहात सोडले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला कदम, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, भाजपचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी सुनावणीला उपस्थित राहून बाजू मांडली. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्वांचे मत समजावून घेतले. दुपारी साडेचारच्या सुमारास सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

एका भेटीची चर्चा

सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुफ्तगू झाल्याची चर्चा रंगली. ही भेट नेमकी कशासाठी झाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

किती हरकती स्वीकारणार?

एकाच दिवशी ३१८ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. हरकती आणि सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांना प्रभागरचना अंतिम करून १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागाला सादर करावी लागणार आहे. कोणत्या प्रभागातील आणि किती हरकती स्वीकारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभागरचनेवर आलेल्या ३१८ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पार पडली आहे. किती हरकती, सूचना स्वीकारल्या, याचा अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून येईल. त्यानंतर प्रभागरचना अंतिम केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.