पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३१८ हरकतींवर चिंचवड येथील ॲटो क्लस्टर सभागृहात बुधवारी (१० सप्टेंबर) एकाच दिवशी सुनावणी घेतली जाणार आहे. राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत.

महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारुप रचना जाहीर केली. प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. या प्रभाग रचनेवर १४ दिवसात एकूण ३१८ हरकती आल्या आहेत. यामध्ये माेरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या प्रभागाच्या रचनेवर सर्वाधिक ११५, प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, माेरेवस्ती या प्रभागाबाबत ९८ आणि महेशनगर, संत तुकारामनगर व वल्लभनगर प्रभागाबाबत ३१ हरकती आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक पाच, १३, १५, १६, १७, १८, २५, २७ आणि २८ या प्रभागांच्या रचनेबाबत एकही हरकत आली नाही. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमोर बुधवारी दुपारी एक ते चार या वेळेत ३१८ हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे.

प्रभाग क्रमांक एक, दोन, ११, १२ मधील हरकतींवर दुपारी एक वाजता, प्रभाग क्रमांक तीन, चार, सहा, सात, आठ, नऊ, २०, ३० मधील हरकतींवर दोन वाजता, प्रभाग क्रमांक दहा, ११ मधील हरकतींवर तीन वाजता आणि प्रभाग क्रमांक १४, १९, २१, २२, २३, २४, २६, २९, ३१, ३२ मधील हरकतींवर दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे.

हरकत घेणाऱ्या नागरिकाला हरकत दाखल केल्याची पोहोच, सुनावणी नोटीसची प्रत, ओळखपत्रासह प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे. त्यासाठी सूचना पत्र पाठविले आहे. किती हरकती स्वीकारायच्या, स्वीकारायच्या की नाही, प्रारुप रचनेत बदल करायचा की नाही, याचा अहवाल प्राधिकृत अधिकारी दराडे देतील. त्यानंतर अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा तयार करुन राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभाग रचनेवर आलेल्या ३१८ हरकतींवर बुधवारी एकाच दिवशी सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकत धारकाला सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र पाठवले आहे. अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका