पावलस मुगुटमल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : जम्मू-काश्मीरसारख्या बर्फाच्छादित प्रदेशापासून संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशापर्यंत उष्णतेच्या लाटांमागून लाटा येत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रही आत्तापर्यंत कधी नव्हता इतका काहिलीने त्रासला आहे. मध्य महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत येत्या आठवडय़ात उष्णतेची आणखी तापदायक लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील शहरी भागांतील पारा अचानक उसळी मारत असल्याचेही नमूद होत आहे.

उत्तर-पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंडीगड तसेच हिमालयीन विभागासह पश्चिम भागात गुजरात ते मध्य प्रदेशापर्यंत गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे सातत्याने कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने महाराष्ट्रातही सातत्याने उष्णतेच्या लाटा आल्या. मुंबईसह कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एकापाठोपाठ उष्णतेच्या लाटांची स्थिती आली.

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानातील वाढ कायम राहिली. एप्रिलच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत यंदा मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, जळगाव, नाशिक आणि मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या आठ ते दहा वर्षांच्या तुलनेत तापमानाचा पारा अधिक राहिला. आता एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यातही विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान ४० ते ४१ अंशांच्या पुढेच आहे. मुंबई आणि उपनगरांचा पाराही सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगावमध्ये शनिवारी राज्यातील उच्चांकी ४४.० अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर, नाशिक आदी शहरांचा पाराही ४० अंशांपुढे गेला होता.

देशातील स्थिती..

राजस्थान, हरियाणा आणि उत्तरेकडील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. गुजरातमध्ये सध्या लाट कायम आहे. परिणामी उत्तर -दक्षिण देशातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. उत्तरेकडून वारे वाहणार असल्याने महाराष्ट्रातही दोन दिवसांनंतर सर्वत्र कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

तीव्र झळाक्षेत्रे..

राज्यात मार्चपासून चार ते पाच वेळेला उष्णतेच्या लाटा आल्या. विदर्भ आणि त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक लाटा आल्या. सध्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत विविध राज्यांत पावसाळी वातावरण आहे. ते दोन ते तीन दिवसांत निवळेल. त्यानंतर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. प्रामुख्याने जळगाव, नगर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत लाट तीव्र असेल. या जिल्ह्यांच्या शेजारच्या भागातही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अंदाज काय?

  • मार्च महिन्याने १२२ वर्षांतील उन्हाच्या झळांचा उच्चांक मोडला असतानाच एप्रिलमधील काहिलीही विक्रमी ठरण्याची चिन्हे आहेत.
  • तुरळक भागात पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.
  • त्यानंतर तापमानात वाढ होऊन मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट अवतरणार आहे.

विदर्भात अवकाळी पाऊस

नागपूर :  विदर्भातील काही जिल्ह्यांत शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.  २१ एप्रिलला गोंदियासह इतरही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात पाऊस पडला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, कोरपना, जिवती, घुग्घुस येथे गारपीट व मुसळधार पाऊस कोसळला. नागपूर शहरात तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाडय़ात प्रचंड वाढ झाली.

नवनवे उच्चांक..

विदर्भात सर्वाधिक  तीन ते चार वेळा उष्णतेच्या लाटांची स्थिती निर्माण झाली. २० एप्रिलला विदर्भात देशातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअसहून अधिक उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat intense new heat wave coming weeks april record breaking day ysh
First published on: 24-04-2022 at 00:05 IST