पुणे : वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी (१० जून) मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरींची अनुभूती मिळाली. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे काही वेळातच शहरातील रस्ते जलमय झाले. अनेक दिवसांच्या खंडानंतर झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने अनेकांची तारांबळ उडविली असली, तरी काहींनी त्यात भिजण्याचाही आनंद घेतला. पुढील पाच ते सहा दिवस शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे प्रमाण आणि वाऱ्यांचा वेग कमी असल्याने तब्बल दहा दिवस मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवारपर्यंत रखडला होता. मात्र, गुरुवारपासून पोषक वातावरण तयार झाल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच मोसमी पावसाने वेगवान प्रवास करून दक्षिण कोकणात धडक मारली. त्याचबरोबरीने राज्याच्या इतर भागात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील काही भागामध्येही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शहरात यंदा पूर्वमोसमीच्या हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिना सुरू होऊनही पावसाच्या दमदार सरी बरसल्या नव्हत्या. त्यातच शहरातील तापमानाचा पारा वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर आकाश ढगाळ होत असले, तरी पावसाचा केवळ हलका शिडकावा झाला होता. शुक्रवारी मात्र दुपारपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास आंधारून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळातच वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारीही विजांच्या कडकडाटात शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १२ ते १६ जून या कालावधीत शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे