पिंपरी-चिंचवड शहरात पवना आणि मुळा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शिवाय नदीकाठच्या झोपडपट्टीतही पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्व घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ ते ३० कुटुंबाना सुखरूपस्थळी हलवले आहे. तर पाण्यात अडकलेल्या पाच जणांचे प्राण देखील वाचवण्यात यश आले आहे.

पिंपरी-चिंचवडसह अवघ्या महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तुडूंब भरले असून १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या अनेक सखल भागात, सोसायटींमध्ये पाणी शिरले आहे. अनेक कुटुंब घरात अडकलेली होती, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपस्थळी हलवले आहे. जुनी सांगवी, पिंपरी, वाकड, या परिसरात घरात पाणी शिरले आहे. तर वाकड परिसरात मुळा नदीचे पाणी नदीपात्र सोडून मुख्य रस्त्यांवर आले आहे. यामुळे हिंजवडीत जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यावरील पाण्यातून वाट काढत नागरिक पुढे जात आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्याने  काही ठिकाणी नागरिकांनी पावसाची मजा घेण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे.  शहरातील प्रसिद्ध  मोरया मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे.  नागरिकांनी पाण्यापासून दूर राहावे असे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.