संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. जोराचा पाऊस व रस्त्यावरचा अंधूक प्रकाश यामुळे समोरचा खड्डा दिसलाच नाही. दुचाकी रस्त्यातच आडवी झाली, डोके रस्त्यावर जोरात आदळले. प्राणच जायचा, पण डोक्याला हेल्मेट होते म्हणून जीव वाचला!
हडपसरमधील एका कंपनीत काम करणाऱ्या प्रसाद पुनवटकर यांचा ३० जुलै रोजी हडपसरहून पुण्याला येताना किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी पुलावर अपघात झाला. पुनवटकर संध्याकाळी आपल्या मोटारसायकलने ३० ते ३५ च्या वेगाने गाडी चालवत पुण्याच्या दिशेने येत होते. अंधूक प्रकाश आणि पावसामुळे त्यांना समोरचा खड्डा दिसलाच नाही. त्या खड्डय़ामध्ये त्यांची दुचाकी अडकली व ते उजव्या बाजूला पडले. त्यामुळे त्यांच्या उजव्या हात आणि पायासह संपूर्ण उजव्या बाजूला जबर मार लागला. डोके रस्त्यावर जोरात आदळले. पण हेल्मेट घातल्यामुळे फक्त खरचटण्यावर निभावले.
‘‘हेल्मेटमधूनही मला मार जाणवला. ते रस्त्यावर घासले गेले. हेल्मेट घातले नसते तर मी मेलो असतो किंवा काहीतरी गंभीर दुखापत तरी झाली असती. मी हातवारे करुन माझ्या मागे सहा फुटांवर असलेल्या ट्रकला थांबवले. तो थांबला आणि नंतर इतर दुचाकीस्वारांनी मला मदत केली,’’ अशा शब्दात पुनवटकर यांनी आपला अनुभव सांगितला. पुनवटकर यांनी त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना देखील दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. माझे अनेक मित्र आणि सहकारी केशरचना बिघडते किंवा हेल्मेटमधून ऐकू येत नाही, अशी कारणे देतात. पण काहीही कारण असले तरी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे, असे मत पुनवटकर यांनी व्यक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
हेल्मेटमुळे जीव वाचला!
जोराचा पाऊस व रस्त्यावरचा अंधूक प्रकाश यामुळे समोरचा खड्डा दिसलाच नाही. दुचाकी रस्त्यातच आडवी झाली, डोके रस्त्यावर जोरात आदळले. प्राणच जायचा, पण डोक्याला हेल्मेट होते म्हणून जीव वाचला!
First published on: 13-08-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmate saves life