सुगंधी आंबेमोहोर तांदूळ  हा तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. विशेषत: पुणे-मुंबईत आंबेमोहोर तांदळाला मोठी मागणी असते. आंबमोहोर तांदळाला देशातून तसेच युरोप आणि अमेरिकेतून मागणी वाढली आहे. टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर घाऊक बाजारात दहा किलोमागे आंबेमोहोर तांदळाच्या भावात ५० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यात आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी कोलम  तांदळाच्या उत्पादनात वाढ केली आहे. आंबेमोहोर तांदळाच्या तुलनेत कोलमचा उत्पादन खर्च कमी येतो, तसेच कमी वेळेत कोलमचे उत्पादन हाती येते. त्यामुळे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांनी कोलमच्या उत्पादनाला पसंती दिली आहे. त्यामुळे आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांपासून घट झाली आहे.

महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा आंबेमोहोर तांदूळ मध्यप्रदेशातून येतो. जवळपास ८० टक्के आंबेमोहोर तांदूळ मध्यप्रदेशातून येतो. उर्वरित २० टक्के आंबेमोहोर तांदळाची आवक आंध्रप्रदेशातून होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहोरची विक्री पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलने करण्यात येत होती. पहिल्या टप्प्यात पुणे शहरात प्रतिक्विंटल आंबेमोहोर तांदळाला ६ हजार रुपये असा भाव मिळाला. त्यानंतर प्रतिक्विंटलचा भाव सहा ते सात हजार रुपये क्विंटल असा मिळाला.

दरस्थिती..

व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर आंबेमोहोर खरेदी केल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रतिक्विंटलच्या भावात एक हजार ते दीड  हजार रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारात सध्या आंबेमोहोर तांदळाच्या एक किलोचा भाव ८० ते ८५ रुपये दरम्यान आहे. किरकोळ बाजारात आंबेमोहोर तांदळाचा एका किलोचा भाव ८५ ते ९० रुपये दरम्यान आहे.

झाले काय? मागणी जास्त त्या तुलनेत अपुरी आवक होत असल्याने आंबेमोहोर तांदळाचे दर वाढले आहेत.  ११२१ जातीच्या बासमती तांदळाएवढेच भाव सध्या आंबेमोहोर तांदळाला मिळत आहेत. टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर देशांतर्गत आणि युरोपातील बाजारपेठेतून आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढली. त्यामुळे आंबेमोहोराच्या किंमतीवर परिणाम झाला.

आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. डिसेंबरमध्ये आंबेमोहोर तांदळाचे नवीन उत्पादन सुरू होईल. मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशात पाऊस चांगला झाल्यास आंबेमोहोरच्या उत्पादनात वाढ होईल तसेच भावही कमी होतील. यंदाच्या वर्षी आंबेमोहोर तांदूळ आणि बासमती तांदळाचे भाव सारखेच आहेत.

– राजेश शहा, तांदूळ व्यापारी,  जयराज अँड कंपनी, मार्केटयार्ड

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High prices for ambemohor rice abn
First published on: 10-07-2020 at 00:23 IST