पिंपरी : गुन्ह्यांच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी आणि गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला आता न्याय सहायक वैद्यकीय पथक आणि एक अत्याधुनिक मोटार मिळाली आहे. गृह विभागाने ही विशेष मोटार दिली असून, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते या मोटारीचे उद्घाटन करण्यात आले.

एक जुलै २०२४ पासून देशात नवीन कायदे लागू झाले आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश आहे. या नवीन कायद्यांनुसार, ज्या गुन्ह्यांना सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, अशा घटनांच्या तपासासाठी घटनास्थळावरून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करणे अनिवार्य आहे. यासाठी या न्याय सहायक वैद्यकीय पथकाची आणि मोटारीची आवश्यकता होती.

मोटारीत काय?

या मोटारीमध्ये तपासणीसाठी आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक उपकरणे आणि किट्स उपलब्ध आहेत. यामध्ये एनडीपीएस, डीएनए, पावलांचे ठसे, सायबर तपासणी, आग आणि स्फोटक तपासणी, बुलेट चाचणी, रक्ताचे नमुने तपासणी आणि बलात्कार प्रकरणांसाठी रक्त व वीर्य तपासणी किटचा समावेश आहे. या मोटारीमध्ये सहा न्याय सहायक वैद्यकीय तज्ज्ञ नेमण्यात आले आहेत, ते घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणार आहेत.

न्याय सहायक वैद्यकीय पथक, अत्याधुनिक मोटारीमुळे गुन्ह्यांचे पुरावे जलद आणि अचूकपणे गोळा करता येतील. तपास करणे सोपे होईल. आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड