पदोन्नतीसाठी वर्णी लागावी, महाविद्यालयांच्या तक्रारी, एखाद्या नियुक्तीबाबत आक्षेप, वेतनवाढीसाठी प्रयत्न, महाविद्यालयाच्या विविध परवानग्या.. अशी अनेक गाऱ्हाणी घेऊन महाविद्यालयातील शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयात सतत गर्दी दिसत असते. मात्र, अशी सततची गाऱ्हाणी मांडणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना वैतागलेल्या विभागीय सहसंचालकांनी आता महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे धाव घेतली आहे. अशा कामाचा खोळंबा करणाऱ्या शिक्षकांना आवरण्यासाठी सहसंचालकांनी प्राचार्याना पत्र पाठवले आहे.
उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्य़ांचे काम चालते. कार्यालयात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सततची गर्दीही या कार्यालयासाठी तशी नवीन नाही. महाविद्यालयाचे काम काढून आपले वैयक्तिक काम पुढे सरकवण्यासाठी प्रयत्न होत असतात. ‘इथेच आलो होतो.. आलो जरा भेटायला.’असे कारण घेऊन येणाऱ्या शिक्षक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गप्पांचे रंगलेले फड इथे नेहमीच दिसतात. मात्र, त्यामुळे कार्यालयाचे नियमित काम थंडावलेले असते.
सतत काही ना काही कारण काढून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेणाऱ्या उत्साही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आता विभागीय कार्यालयातील कर्मचारीही वैतागले आहेत. या उत्साही कार्यकर्त्यांमुळे कामे खोळंबत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सगळ्यावर उपाय म्हणून विभागीय कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांचा अनावश्यक वेळ घेणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाच विभागीय सहसंचालकांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याना दिल्या आहेत. याबाबत सहसंचालकांनी प्राचार्याना पत्र पाठवले आहे. ‘बहुतेक महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी हे पुणे विद्यापीठात काम असल्याने आलो होतोच म्हणून या कार्यालयातही आलो, असे कारण देऊन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अनावश्यक वेळ घेऊन कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आणतात. त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी आणि याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालावे,’ असे या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे कामे घेऊन येणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे यापुढे वरिष्ठांचे संमतीपत्रक असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ‘महाविद्यालयाच्या कोणत्याही कामासंदर्भात यापुढे सोमवारी आणि मंगळवारीच यावे. इतर दिवशी कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकणार नाही,’ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2014 रोजी प्रकाशित
कारणे काढून चकरा मारणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना पुणे विभागीय उच्च शिक्षण संचालनालयाच्या सूचना
सततची गाऱ्हाणी मांडणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना वैतागलेल्या विभागीय सहसंचालकांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे धाव घेतली आहे. अशा शिक्षकांना आवरण्यासाठी सहसंचालकांनी प्राचार्याना पत्र पाठवले आहे.
First published on: 19-11-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher education directorate slams teachers and emp