गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या प्रशिक्षण कार्याची गृहमंत्रालयाकडून दखल

देशपातळीवर पोलिसांना गुप्तवार्ता संकलनाचे प्रशिक्षण देणारी ही पहिलीच संस्था आहे.

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून गौरव

पुणे : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी या प्रशिक्षण संस्थेतून आतापर्यंत पोलीस आधिकारी, कर्मचारी अशा २१ हजार जणांनी प्रशिक्षण घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रबोधिनीच्या कार्यालयाची दखल घेतली असून पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनीस दोन लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

देशपातळीवर पोलिसांना गुप्तवार्ता संकलनाचे प्रशिक्षण देणारी ही पहिलीच संस्था आहे. दिल्लीत केंद्रीय पातळीवर गुप्तवार्ता प्रशिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना २००९ मध्ये झाली. तत्पूर्वी पुण्यातील वडाची वाडी येथे विशेष सुरक्षा प्रशिक्षण केंद्र आणि मुंबईतील दादर येथे विशेष शाखा प्रशिक्षण केंद्र होते. या दोन्ही संस्थांचे विलीनीकरण करून  महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली, अशी माहिती प्रबोधिनीचे संचालक विशेष पोलीस महानिरीक्षक महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस उपअधीक्षक अश्विनी राख, उपअधीक्षक विजयकुमार पळसुले आदी या प्रसंगी उपस्थित होते.

गुप्तवार्ता प्रबोधिनीविषयी

राज्य गुप्तवार्ता विभागात (एसआयटी) थेट निवडल्या जाणाऱ्या गुप्तवार्ता अधिकारी आणि वरिष्ठ आधिकाऱ्यांना मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा , मर्मस्थळ, सागरी सुरक्षा, गुप्तवार्ता, घातपातविरोधी तपासणी, मूलतत्त्ववाद, दहशतवाद या विषयी प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत ७३७ प्रशिक्षण सत्रे पार पडली आहेत. उर्दू, बंगाली, तेलगू, माडीया गोंडी, गुरुमुखी, काश्मिरी या भाषांचे प्रशिक्षण दिले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Home ministry takes care training work intelligence academy akp

ताज्या बातम्या