मूळ गावी जाण्याचा प्रयत्न
पिंपरी: आयटी हब हिंजवडीलगत माण येथील बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर टाळेबंदीचे निर्बंध झुगारून मंगळवारी थेट रस्त्यावर उतरले. टाळेबंदीची मुदत पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने धास्तावलेले हे मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करा, अशी आग्रही मागणी करत होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
टाळेबंदीत एक महिन्याहून अधिक काळ हिंजवडी परिसरात अडकून पडलेल्या बांधकाम मजुरांचा मंगळवारी संयम सुटला. पुन्हा टाळेबंदीची मुदत वाढण्याच्या शक्येतने ते धास्तावले होते. त्यातून हे मजूर एकत्र आले.
माणकडून हिंजवडीच्या दिशेने ते जमावाने जाऊ लागले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांचा ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मजुरांची समजूत काढली.
संबंधित प्रकल्प व्यवस्थापकांना बोलावून घेतले. टाळेबंदी संपेपर्यंत मजुरांची काळजी घेण्यास त्यांना बजावण्यात आले. टाळेबंदीचा निर्णय आमच्या हातात नसल्याचे सांगतानाच, तुम्ही कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही पोलिसांनी या वेळी
दिली. मात्र, टाळेबंदीचे नियम मोडल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी मजुरांना दिला.