घरगुती वादाला कंटाळून पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर येथे घडली आहे. सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा मुळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) किसन रामा कांबळे ( वय ३५, रा. केम, ता. करमाळा) अशी दोघांची नावे आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर किसनने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा आणि किसन हे मागील सात वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. किसन याने आठ ते दहा दिवसांपूर्वी सुवर्णा यांच्या घरी जाऊन तिच्या आईची भेट घेतली. सुवर्णाला पुन्हा घरी घेऊन जाण्याची तयारी दाखवत त्याने सुवर्णाचा पत्ता मिळविला. बुधवारी पहाटे काळभोरमध्ये जाऊन किसनने सुवर्णाची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी किसनने पत्नी सुवर्णाला दांडक्याने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या झाडाला साडी बांधून किसनने गळफास घेऊन आत्महत्या केली.