“मी एका गुन्ह्याची मागील १६ वर्षापासुन येरवडा कारागृहात शिक्षा भोगतो आहे. कारागृहात अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मी नेहमी सहभागी होत असतो.  यंदा पहिल्यांदाच कैदी बांधवांसाठी ढोल ताशा पथक स्थापन करून प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कारागृहातील साहेबांशी चर्चा केली. मला देखील ढोल ताशा पथकात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी माझ्यातील उत्साह आणि इच्छा लक्षात घेता, मला होकार दिला. यानंतर आमच्या ढोल ताशा पथकाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजअखेर आमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून आता गणरायाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याबाबतचे वेगळं समाधान आहे. आता माझी शिक्षा वर्षभराची राहिली आहे. येथून बाहेर पडल्यावर ढोल ताशा पथक स्थापन करून गणरायाची सेवा करणार.” असे कारागृहातील कैदी सुनील कांडेकर यांनी म्हटले आहे. लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना कांडेकर यांनी ही इच्छा व्यक्त केली.

देशभरात विविध भागात गणरायाचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे. पुण्यात देखील विविध मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत केले आहे. मात्र यंदा पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळासमोर येरवडा कारागृहातील ३० कैद्यांनी ढोल ताशाचे वादन करून गणेशोत्सवमध्ये सहभाग नोंदवला. या कैद्यांचे वादन पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

यावेळी कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद म्हणाले की, “कारागृहांमधील कैद्यांनी शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्या चांगले जीवन जगण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पण यंदा प्रथमच कैद्यांना ढोल ताशा पथक सहभागाबद्दल विचारण्यात आले. यासाठी अनेक कैदी पुढे आले. त्यातून आम्ही ३० कैदी निवडले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे कैद्यांमधील वर्तनात चांगला बदल घडवून आल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता या पुढील काळात कायम स्वरूपी ढोल ताशा पथक असणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

या कैद्यांना प्रशिक्षण देणारे गिरीश मुरडकर म्हणाले की, “मागील अनेक वर्षापासुन ढोल ताशा पथकामध्ये वादन केले आहे. पण ज्यावेळी कारागृहातील बांधवाना प्रशिक्षण द्यायचे समजल्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यावेळी आम्ही आता गेलो तेव्हा कैदी बांधवांशी संवाद साधला त्यावेळी एक समाधान लाभले. की त्यांच्याकडून चूक झाली असली. तरी ते आपल्या मधील एक आहेत. त्या सर्वाना महिनाभर प्रशिक्षण दिले असून ते सर्व उत्तम वादक झाले” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.