राज्यातील आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना नाना पटोले यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचं दिसून आलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे, नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे, आपल्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, स्वतंत्रपणे स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची त्यालाही मी शुभेच्छा देतो. कारण, असे स्वबळावर लढण्याचे प्रयोग प्रत्येक पक्ष करत असतो, केला पाहिजे. त्यांनी पश्चिम बंगालमध्येही स्वबळावर लढण्याचा प्रयोग करून पाहिला. असे प्रयोग करत राहिले पाहिजे आणि स्वबळावर काँग्रेस केंद्रात सत्तेवर येणार असेल, तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही. जर नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचा पराभव करण्याची ताकद स्वबळावर काँग्रेस पक्षाने निर्माण केली, तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.”

“स्थानिक पातळीवर राजकारण, कुरघोड्या होत असतं, पण…”; संजय राऊतांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

तर, या अगोदरही नाना पटोले यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडलेली आहे. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणालेले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे –
“ही चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र अनलॉक होतो आहे आणि खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक अत्यंत सावधगिरीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हळूहळू जिल्ह्यानुसार प्रत्येक टप्प्यावर लोकांना त्रास न होता निर्बंध कसे कमी करायचे? याची आखणी केली आहे. त्याबद्दल खरंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे. निर्बंध काळात नक्कीच जनतेला विविध कारणांमुळे त्रास होत असतो, पण आता हळूहळू महाराष्ट्र त्यामधून बाहेर पडतो आहे, ही चांगली गोष्ट आहे.” असं देखील संजय राऊत माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले.