शहरातील नागरिकांना अगोदर लहान मोठ्या गोष्टींवर कारवाई होण्याची सवय नव्हती. आता कारवाई होते आहे त्यामुळे नागरिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत असं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले आहेत. सांगवी आणि चिंचवड येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या संबंधी घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे. कायदा मोडणार असाल तर कारवाई नक्कीच होणार असल्याचा इशारा त्यांनी शहरवासीयांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याची घटना घडल्यानंतर चिंचवडमध्ये विनामास्क वाहन चालविणाऱ्या मोटार चालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच अंगलट आलं होतं. वाहतूक पोलीस पुढे येताच मोटार चालकाने गाडी वेगात नेली यात पाय अडकल्याने वाहतूक पोलीस तसाच एक किलोमीटर पर्यंत मोटारीच्या बोनेटला धरून होता. हा थरार चिंचवडमध्ये घडला आहे. या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली आहे असं म्हटलं आहे.

कृष्ण प्रकाश म्हणाले की, आत्तापर्यंत शहरातील नागरिकांना लहान मोठ्या चुकांवर कारवाई होण्याची सवय नव्हती. आता होत आहे त्यामुळे  नागरिक आक्रमक होत आहेत. अस कृष्ण प्रकाश म्हणाले आहेत. शहरातील सांगवी आणि चिंचवड परिसरात ज्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भात आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहतुकीच्या बाबतीत अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन त्यांनी पालकांना केले आहे. इतर चालकांनी लक्षात घ्यावं की अशा प्रकारे गुन्हा केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.