दिवाळीच्या सणासाठी मूळ गावी परतण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली असताना विविध मार्गावर प्रवाशांची मागणी वाढत असल्याने काही वाहतूकदारांकडून खासगी प्रवासी बसच्या भाडय़ामध्ये दीडपट ते दुपटीने वाढ केली आहे. प्रवासाची गरज म्हणून केवळ नाइलाजास्ताव प्रवाशांकडून हा भलामोठा फटका सहन केला जात आहे. मात्र, त्याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली जात असून, सणासुदीतील भाडेवाढ ही दरवर्षीची डोकेदुखी असल्याने खासगी बसच्या भाडय़ावरही नियंत्रण आणावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
दिवाळीत मूळ गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशाला एक किंवा दोन महिने आधी आरक्षण न देण्याची चलाखी यंदाही काही वाहतूकदारांकडून करण्यात आली. मागणी नसल्याच्या दिवसांमध्ये खासगी वातानुकूलित बसचे भाडे हे एसटीच्या शिवनेरी गाडीच्या भाडय़ाइतकेच असते. मात्र, मागणी वाढत गेल्यास खासगी वाहतूकदारांकडून भाडय़ातही मोठय़ा प्रमाणावर वाढ करतात. त्याचा अनुभव यंदाच्याही दिवाळीमध्ये प्रवाशांना येतो आहे. दिवाळी सुटीच्या दिवसांमधील प्रवासासाठी ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी आरक्षणासाठी गेलेल्या प्रवाशांना यंदाही आरक्षण मिळाले नसल्याचा अनुभव अनेकांना आला. आता नोव्हेंबरच्या तोंडावर भाडेवाढ करून हे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.
रेल्वेकडून राज्यात व देशात सोडण्यात येणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण जवळपास हाऊसफुल झाले आहे. एसटीच्या वतीने राज्याच्या विविध भागांमध्ये दिवाळीच्या दिवसामध्ये बाराशे ते तेराशे जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ांच्या माध्यमातून खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यास एसटी सज्ज झाली असली, तरी सर्वाधिक मागणीच्या विदर्भ, मराठवाडय़ात किंवा लांब पल्ल्याच्या विविध मार्गावर वातानुकूलित व स्लीपर कोच गाडय़ांची गरज पाहता प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतूकदारांकडे धाव घ्यावी लागत आहे. पुण्यातून नागपूर, अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. नागपूरसाठी टू टायर एसी रेल्वेसाठी सुमारे १७०० रुपये भाडे आहे. इतर वेळेला खासगी वाहतूकदारांकडून नागपूरसाठी १५०० ते १७०० रुपये भाडेआकारणी करण्यात येते. हे भाडे सध्या काही वाहतूकदारांनी २५०० ते ३००० रुपयांवर पोहोचविले आहे.
पुण्यातून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, पण परतताना प्रवासी मिळत नाहीत. आमचे हेच कमविण्याचे दिवस असतात, इतर वेळेला गाडय़ा रिकाम्या धावतात, भाडेवाढीमागे अशी विविध कारणे वाहतूकदारांकडून खासगीत सांगण्यात येतात. मात्र, गरजेच्या वेळेला प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याच्या या प्रकाराबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खासगी बसभाडय़ावरील नियंत्रणाचे काय झाले?
खासगी बसच्या भाडय़ामध्ये होणाऱ्या मनमानी पद्धतीच्या वाढीबाबत अनेक प्रवाशांकडून प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात येत असतात. याच तक्रारींची दखल घेऊन सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अधिकृतपणे राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. खासगी बसचे भाडे त्या-त्या भागातील परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले होते. मात्र, राज्य शासनाने मागील तीन वर्षांमध्ये त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत एक प्रवासी श्रीनिवास ढावरे म्हणाले, की टॅक्सी व रिक्षा याही खासगी सेवा आहेत. पण, त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असल्याने प्रवाशांची लूट होणार नाही व ही सेवा देणाऱ्यालाही तोटा होणार नाही, अशा पद्धतीने भाडे ठरविण्यात येते. त्यानुसार खासगी प्रवासी बसचेही भाडे ठरविले गेले पाहिजे. त्याशिवाय ही लूट थांबणार नाही.