गेल्या दोनेक दशकात परदेशी पाखरांनी भारतीय पेट बाजारात सहज शिरकाव केला आणि त्यांच्या प्रजोत्पादनाच्या व्यवसायाने भारतीय बाजारपेठेत आपले बस्तान बसवले. गेल्या दशकभरात या उद्योगाची उलाढाल दरवर्षी शंभर कोटीहून अधिक होत आहे. झपाटय़ाने भरभराट झालेल्या या बाजारपेठेत दरवर्षी साधारण २० टक्के वाढीची नोंद होते आहे. बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या अहवालातून समोर आलेली आकडेवारी कमी वाटावी अशी परिस्थिती पक्ष्यांच्या काळाबाजाराची आहे. प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून अधिकाधिक दुर्मीळ पक्षी बाळगण्याच्या हौशी पक्षी पालकांची असोशी पक्ष्यांच्या बाजारातील गैरप्रकारांना प्रोत्साहन देणारीच ठरली आहे. पक्षी पालनाच्या या जागतिक हौशीने पक्ष्यांच्या अनेक प्रजातींची नोंद दुर्मीळ म्हणून करण्याची वेळ आली आहे.

पक्ष्यांचा काळाबाजार

भारतात १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आला. मात्र त्यानुसार फक्त प्राणी किंवा पक्ष्यांच्या भारतातील प्रजातींनाच संरक्षण मिळाले. या कायद्यानंतर दर दोन घराआड पाळल्याा जाणाऱ्या पोपटाला स्वातंत्र्य मिळाले. मैना, कोकिळा, धनेश, हिरवी कबुतरे, मोर, गरुड, जलपक्ष्यांच्या प्रजाती, मुनिया, चिमण्या बाळगणे गुन्हा झाले. मात्र त्याचवेळी भारताबाहेर या पक्ष्यांची छुप्या मार्गाने विक्री सुरू झाली. अगदी कावळाही त्यातून वाचला नाही. दरवर्षी मुनिया या प्रजातीच्या हजारो पक्ष्यांचे छुप्या मार्गाने व्यवहार चालतात.

परदेशी जातीच्या पक्ष्यांना पाळण्यासाठी कोणतीच बंधने नाहीत. या पक्ष्यांचा व्यापार करण्यासाठी काही अंशी बंदी आली असली तरीही त्या नियमांमधील पळवाटा या व्यवसायाच्या पथ्यावरच पडल्या आहेत. हे पक्षी ज्या देशातील आहेत, त्या देशांमध्ये त्यांना बाळगण्यावर, त्यांचा व्यापार करण्यावर बंदी आली. परिणामी अधिकृतपणे आपल्या बाजारपेठेत दाखल होण्याची या पक्ष्यांची वाट बंद झाली. त्यातूनच छुप्या मार्गाने पक्ष्यांचा भारतीय बाजारात प्रवास सुरू झाला.

आपल्याकडे ‘एक्झॉटिक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांचा छुप्या मार्गाने चालणारा बाजार आजही भारतात बिनदिक्कतपणे सुरू आहे. एक्झॉटिक पक्ष्यांना कायद्याचेही संरक्षण नाही. सर्वाधिक दुर्मीळ पक्षी आपल्याकडेच असावा यासाठी लाखो रुपये मोजायला हौशी पालक तयार आहेत आणि परिणामी पक्ष्यांचे प्रजोत्पादन करून त्यांची विक्री करण्याच्या उद्योगाइतकाच त्यातील काळाबाजार वाढतो आहे. मकाऊ, ग्रे पॅरेट, कोकॅटो, किंग पॅरेट, लॉरिकिट्स, फिंच, कनेरी, टुकान, फिजंट यासारख्या अनेक परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींना मागणी आहे. त्याशिवाय शर्यतीची कबुतरेही छुप्या मार्गाने या बाजारात येतात.

ऑनलाईन बाजारपेठेकडून बळ

अनेक दुर्मीळ प्राणी-पक्ष्यांची विक्री सर्रास सुरू असते. यामध्ये विक्री करणाऱ्या संकेतस्थळांबरोबर अनेक ब्रीडर्सही ऑनलाईन विक्रीवर भर देतात. संकेतस्थळावर फोटोवरून निवड केलेला पक्षी घरी आणून पोहोचवला जातो. व्यवहारांमधील क्लिष्टता कमी झाल्यामुळेही तेजीत असलेल्या बाजारावर नियंत्रण आलेले नाही. जगात पोपटाच्या साधारण २ हजार प्रजाती आहेत. त्यातील एक तृतीयांश प्रजाती निसर्गातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

‘अ‍ॅनिमल वेलफेअर इन्स्टिटय़ूटच्या एका संशोधन अहवालानुसार अमेरिकेतून दरवर्षी ८ लाख पक्ष्यांची निर्यात होते. त्याशिवाय अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज बेटे, ब्राझील आणि इतर देशांमधून पक्ष्यांच्या विविध प्रजाती भारतीय बाजारात येतात. अनेक प्रजाती आता येथील वातावरणाला सरावल्या असल्यामुळे त्यांचे ब्रिडिंग केले जाते. दुर्मीळ होत जाणाऱ्या या पक्ष्यांना पाळण्यावर सर्वच देशात बंदी घालण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जाते आहे.