पावलस मुगुटमल

पुणे : महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये बहुतांश भागांत जुलै महिन्यातील पावसाने सरासरीचे आकडे  पार केले असले, तरी उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तरेकडील काही भागांसह देशातील एकूण नऊ राज्यांमध्ये अद्यापही  पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे देशातील पावसाचा असमतोल जुलैच्या मध्यानंतर ठळकपणे समोर आला आहे. विशेष म्हणजे जूनमध्ये पावसात आघाडी घेतलेल्या ईशान्येकडील राज्यांतही अनेक ठिकाणी आता सरासरीच्या तुलनेत पाऊस मागे पडला.

जून महिन्यामध्ये मध्य भारतासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने हात आखडता घेतला होता. मोसमी वारे सक्रिय होऊनही मोठा पाऊस झाला नव्हता. या काळात मोसमी वाऱ्यांची बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र सक्रिय झाली होती. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये दमदार पाऊस झाला होता. जुलैच्या सुरुवातीला अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांची शाखा सक्रिय झाली. त्यामुळे अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतात बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण भारतातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. जूनच्या अखेपर्यंत महाराष्ट्रासह बहुतांश भाग मागे पडला होता. मात्र, जुलैत ही तूट भरून काढली गेली.

 महाराष्ट्रात सध्या सरासरीच्या तुलनेत ३९ टक्के पाऊस अधिक आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांमध्येही पाऊस सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तेलंगणामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे तब्बल ११९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. देशाच्या एका भागात पावसाची स्थिती चांगली असताना उत्तरेकडील काही राज्ये आणि ईशान्य भारतात मात्र पाऊस मागे पडला आहे. बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काही भागांत अद्याप सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस होऊ शकलेला नाही. उत्तर प्रदेशातील पाऊस सरासरीच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी उणा आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांतही तो उणा ठरलेला आहे. जूनमध्ये सर्वाधिक पाऊस होऊनही मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर आदी राज्ये आता मात्र मागे पडली आहेत.