पूर्वी एखादे गाव म्हटले, की त्याचा गावगाडा ठरलेला असायचा. त्यानुसार गावातील गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण होत असत. या गरजा पूर्ण करण्याचे काम गावातील गावकारागीर करीत. कालौघात गावगाड्यात बदल होत गेला. हा गावगाडा बदलत असताना कारागिराच्या आयुष्यातही स्थित्यंतर घडले. अनेक जण पूर्वीपासून सुरू असलेला व्यवसाय सोडून इतर व्यवसाय वा नोकरीकडे वळले. काही जण नेटाने आपला पारंपरिक व्यवसाय कायम ठेवून वाटचाल करीत राहिले. मात्र, यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे या कारागिरांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना आधुनिक प्रवाहात सहभागी करून बळ देण्याचे काम पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुरू आहे.
जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाकडून पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात हजारो कारागिरांना या योजनेमुळे बळ मिळाले आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांत नोंदणी करणाऱ्या कारागिरांची संख्या तब्बल २८ हजार ९३९ आहे. त्यातील ७ हजार ९३४ अर्जदार आतापर्यंत या योजनेसाठी पात्र ठरले असून, इतर अर्जांची पडताळणी सुरू आहे. या योजनेत पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिराला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेतून कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. कारागिराला या योजनेतून एकूण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आणि नंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या कर्जासाठी त्याला फक्त पाच टक्के व्याजदर आकारला जातो. या योजनेतून आतापर्यंत एकूण ९५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे.
जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. विश्वकर्मा योजनेत १८ पारंपरिक कारागिरांचा समावेश आहे. पुण्यात या योजनेतून सर्वाधिक फायदा पारंपरिक बाहुली आणि खेळणी बनविणाऱ्या कारागिरांना झाला. या योजनेतून अशा १ हजार ५३६ कारागिरांना लाभ मिळाला आहे. त्यानंतर केशकर्तनाचा व्यवसाय करणारे ९९५, फुलांच्या माळा बनविणारे ८२०, कपडे शिवणारे ५६७, सोनारकाम करणारे ५३७, पिशव्या आणि झाडू बनविणारे ५०७, कपडे धुणारे ४८०, पादत्राणे तयार करणारे ४१३, लोहकाम करणारे ३२७, मातीकाम करणारे ३२०, हातोडा व टूलकिट बनविणारे ३१८, लाकूडकाम करणारे २६९, मासे पकडण्याची जाळी बनविणारे २२५, मूर्तिकार २२०, धातूकाम करणारे २१७, अस्त्रकार ८५, कुलूप तयार आणि दुरुस्त करणारे ५७ आणि होडी बनविणारे ४१ अशा कारागिरांना फायदा झाला आहे. या कारागिरांना केवळ कर्जच नव्हे, तर आधुनिक पद्धतीने व्यवसाय करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे हे कारागीर व्यवसायाला आधुनिक रूप देऊन यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
प्रशिक्षणावर भर
विश्वकर्मा योजनेत १८ पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या पारंपरिक कामांचे कारागिरांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या काळात कारागिराला दररोज ५०० रुपये मानधनही मिळते. याचबरोबर कारागिरांना १५ हजार रुपयांची साधने दिली जातात. ही साधने त्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली आधुनिक साधने असतात, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी दिली.
sanjay.jadhav@expressindia.com