नारायणगांव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला २० ते ४० रुपये भाव मिळाला. टोमॅटोला किलोमागे एक रुपया मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समितीच्या आवारात फेकून निषेध व्यक्त केला.

नारायणगाव उपबाजार केंद्रात बुधवारी काही शेतकरी आपले टोमॅटो विक्रीसाठी घेऊन आले होते.  मात्र अनेक व्यापाऱ्यांनी टोमॅटोच्या प्रतवारीनुसार २० किलोच्या एका क्रेटला २० ते ४० रुपये बाजारभाव सांगितल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समितीच्या आवारात फेकून दिले. बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, भास्कर गाडगे, संतोष चव्हाण, प्रियंका शेळके, माजी सभापती रघुनाथ लेंडे ,संतोष खैरे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, चेतन रुकारी ,उपसचिव शरद धोंगडे यांनी शेतकऱ्यांची भेट  घेतली.

हेही वाचा >>> पुणे: सिंहगडाच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून मानवाचे अस्तित्व? खडकावरील रेखाटने उजेडात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार समितीमध्ये सकाळी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ६० ते १५० रुपये भाव देण्यात आला. मात्र, दुपारी २० ते ४० रुपये दराने टोमॅटोची खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, मुजोरपणाने वागणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा संचालक माऊल खंडागळे यांनी दिला. शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येईल, असेही खंडागळे यांनी सांगितले. तर टोमॅटोची अवाक वाढली आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे बाजार समितीचे उपसचिव शरद धोंगडे यांनी सांगितले.