पिंपरी- चिंचवड: निगडीमध्ये चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबर कामासाठी उतरलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ऐन स्वातंत्र्य दिना दिवशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसेप अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडीमधील बीएसएनएल इन्स्पेक्शन चेंबरमध्ये तीन कंत्राटी कामगार ऑप्टिकल फायबर च्या कामासाठी चेंबरमध्ये उतरले होते. एकूण चार कामगार काम करत होते. चेंबरमध्ये तीन फूट पाणी होते. चार पैकी तीन कामगार एक- एक करून चेंबरमध्ये उतरत होते. पहिल्या कामगाराला गुदमरत असल्याने दुसऱ्याने मदत करण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील गुदमरल्याने तिसऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
चौथा कामगार बाबासाहेब वाघ हा वर असल्याने बचावला, त्याने आरडाओरडा केला. अग्निशमन दल दाखल झाले. तीन कामगारांना बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिघांचा मृत घोषित केले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ होत आहे.