आगामी दशकात एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर येईल, असे वाटत नाही. सत्तास्थापनेसाठी ३-४ पक्षांची आघाडीच करावी लागेल, असे मत माजी आमदार रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. राजकारणात मागेल ते कधीच मिळत नाही, दुपटीने मागाल तेव्हा एखादे पदरात पडते, अशी टिपणीही त्यांनी केली.
नाटय़ परिषदेच्या सहकार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचा फुटाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेशकुमार सांकला, हेमेंद्र शहा, सुनील महाजन, गायिका बेला शेंडे, नगरसेवक गणेश लोंढे, आरती चौंधे, विमल काळे आदी व्यासपीठावर होते.
फुटाणे म्हणाले, आजकालचे राजकारण चित्र-विचित्र झाले आहे. कोण कुठल्या पक्षात आहे, कळतच नाही. २४ तास राजकारण करू नये. राजकारणाला समाजकारणाची जोड असावी. राजकारणात घाई करायची नसते. भाऊसाहेबांना आमदार व्हायचे असेल त्यांनी लोकसभा मागावी. दुसऱ्यासाठी झटणारा आपल्यातील कार्यकर्ता शेवटपर्यंत जिवंत राहिला पाहिजे, असे ते म्हणाले. या वेळी फुटाणे यांनी वात्रटिकेतून तर शिंदे यांनी कवितेतून केलेले भाष्य उपस्थितांची दाद मिळवून गेले. प्रास्तविक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. राजेशकुमार सांकला यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2013 रोजी प्रकाशित
राजकारणात दुपटीने मागाल, तेव्हा एक मिळते – फुटाणे
आगामी दशकात एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर येईल, असे वाटत नाही. सत्तास्थापनेसाठी ३-४ पक्षांची आघाडीच करावी लागेल, असे मत माजी आमदार रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
First published on: 07-08-2013 at 02:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In politics demand for two and take one phutane