पिंपरी : ‘सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासन न्याय देत नाही. सत्तेतील लोकांचे ऐकले जाते. त्यामुळे रस्त्यावर उतरले पाहिजे. अधिवेशनात मोठे नेते पत्याच्या खेळ खेळत असल्याचा मुद्दा शोधून काढल्यानंतर माझ्यावर पोलीस ठाण्यात कारवाई झाली. आज माझ्यावर दोन ते तीन कारवाया झाल्या आहेत. एफआयआर दाखल झाले आहेत. अंमलबजावणी संचानलयाला (ईडी) घाबरलो नाही. तर, पोलिसांच्या गुन्ह्याला काय घाबरणार आहे’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सरचिटणीस, आमदार आमदार रोहित पवार यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात गडबड झाल्याची शंका असून मी सुद्धा काटावरच पास झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा मेळावा गुरुवारी चिंचवड येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार म्हणाले, ‘अधिवेशनात मोठे नेते पत्याच्या खेळ खेळतात. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहित नाहीत. हा मुद्दा शोधून काढल्यानंतर माझ्यावर पोलीस ठाण्यात कारवाई झाली. पोलीस ठाण्यात,एखाद्या अधिकाऱ्यांसमोर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल तर अधिकारी मोठ्या आवाजात बोलत असेल तर तिथेच आवाज खाली असे बोलायचे, महाराष्ट्रात सर्वसामान्य लोक, विरोधी पक्षातील लोक अधिकाऱ्यांसमोर जातात. तेव्हा ऐकले जात नाही. बीडमधील एक महिला दोन वर्षे पोलीस ठाण्यात जात आहे. तिच्या पतीला मारले आहे. पतीला मारणाऱ्या आरोपींना अटक करावे यासाठी दोन वर्षे पाठपुरावा करीत आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासन ऐकत नाही. पोलीस प्रशासन सत्तेतील लोकांचे ऐकत आहेत. त्यामुळे लोकांसाठी रस्त्यावर उतरावे. आज माझ्यावर दोन ते तीन कारवाया झाल्या आहेत. एफआयआर दाखल झाले असल्याचे कळत आहे. आम्ही संचानलयाला (ईडी) घाबरलो नाही. तर, तुम्हाला काय घाबरणार आहोत’.

‘विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. धर्मवाद झाला. मतदान यंत्रांमध्ये गडबड केल्याची अनेक लोकांना शंका आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने अपेक्षित निकाल आला नाही. त्यामुळे पक्षात, राज्यात नैराश्य पसरले. विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही जल्लोष दिसला नाही. भाजपच्या आमदारांनाही आपण निवडून येऊ असे वाटत नव्हते. कर्जत-जामखेडमध्ये मलाही अनेक अडचणी आल्या. लोकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मी सुद्धा काटावरच पास झालो आहे. काही का होईना पण मी निवडून आलो. का घडले, कसे घडले याचा अभ्यास करत होतो. त्यामुळे यातून बाहेर पडायला वेळ लागला. तीन महिन्यांत अभ्यास संपला की लगेच माझ्यावर कारवाई सुरू झाल्या. अंमलबजावणी संचानलयाला (ईडी), आयकर विभागाची कारवाई झाली. आता सरकारच्या विरोधात बोललो की कारवाई केली जात आहे’, असा आरोपही आमदार पवार यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेची कंत्राटे सत्ताधारी लोकांच्या नातेसंबंधातील लोकांना दिली जातात. याविरोधात लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करताना गुन्हे दाखल झाले तरी पक्ष पाठीशी ठामपणे उभे राहिल. नव्या-जुन्याना सोबत घेऊन काम करावे लागेल. गट-तट ठेऊ नका, विधानसभेला खूप गटबाजी झाली. आता गटबाजी सोडून देऊन महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे’, असे आवाहन पवार यांनी केले.