पुणे : अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. झाडाझडती झाल्यानंतर बुधवार सकाळी हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात एका व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. मंगळवारी जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी चौक परिसरात बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तुलातून गोळी न सुटल्याने तरुण बचावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालायत बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. गेल्या पाच वर्षात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या सराइतांची चौकशी करुन त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. गुन्हेगारांची झाडाझडती सुरू असतानाच मंगळवारी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकाजवळ असलेल्या वनप्लस मोबाइल शोरुमच्या गल्लीत धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल रोखले. अरगडे बांधकाम व्यावसायिक आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स इमारतीसमोर ही घटना घडली.

हेही वाचा…आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?

मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अरगडे कार्यालयातून बाहेर पडले. मोटारीतील वातानुकूलन यंत्रणा त्यांनी सुरु केली. तेवढ्यात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखले. दुचाकीवर बसलेल्या हल्लेखोराने पिस्तुलाचा चाप ओढला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे चाप ओढला गेला नाही. अरगडे यांनी आरडाओरडा केला. दुचाकीवरुन हल्लेखोर पसार झाले. अरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी सकाळी व्यावसायिक वादातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी शिरली असून, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे (रा. शेवाळवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा…पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस

सुधीर शेडगे आणि जयवंत खलाटे लष्करात होते. दोघे सेवानिवृत्त आहेत. शेडगे आणि खलाटे यांची सिक्युरिटी कंपनी आहे. दोघांकडे शस्त्र परवाना आहे.बुधवारी सकाळी शेवाळवाडी येथील नंदिनी ड्रीम सोसायटीत सुरक्षारक्षक भरतीवरुन शेडगे आणि खलाटे यांच्यात वाद झाले. शेडगे यांनी त्यांच्याकडील पिस्तूलातून खलाटे यांच्या पायावर गोळी झाडली. भररस्त्यात गोळीबार झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेडगे यांना ताब्यात घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune police checking of gangsters who has gun 2 incidents of gun violence reported pune print news rbk 25 psg
Show comments