पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतील अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत ७ हजार २००हून अधिक अर्ज दाखल झाले असून, पालकांना अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत आहे. राज्य सरकारने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केल्यानंतरची ही पहिलीच प्रवेश प्रक्रिया असल्याने या प्रक्रियेला पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यातील उपलब्ध शाळा नसल्यासच स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने या पूर्वीच स्पष्ट केले आहे. या बदलामुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला. १६ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस

आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यभरातील ७६ हजार ४२ शाळांमध्ये ८ लाख ८६ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी केवळ खासगी शाळांतील आरटीईच्या एक लाखांपेक्षा अधिक जागांसाठी तिपटीहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे आरटीई प्रवेशांच्या बदललेल्या प्रक्रियेनंतर यंदा अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेशाला प्राधान्य दिले जाणार असल्याने प्रवेश प्रक्रियेला पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो, किती अर्ज येतात ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.