पुणे : मद्याचे दर वाढलेले असतानाच चोरट्यांनी शहरातील मद्य विक्रीची दुकाने लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून मद्याच्या बाटल्या, रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वारजे माळवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत विशाल विलास पाटील (वय ४३, रा. रम्यनगरी, बिबवेवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात तक्रारदाराचे पाटील वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी शनिवारी (१९ जुलै) मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविली. रविवारी सकाळी मद्य विक्री दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस हवालदार सोनार तपास करत आहेत.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांत कल्याणीनगर, येरवडा, कोंढवा भागातील मद्य विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, तसेच रोकड लांबविल्याची घटना घडल्या. मद्यावरील कर वाढविल्यानंतर मद्याच्या दरात वाढ झाली आहे. मद्य दरवाढीनंतर शहरात मद्य विक्री दुकानातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
बंगल्यातून रोकड लांबविली
सिंहगड रस्ता भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सात हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत गुलाब जयराम घाटे (रा. आनंदलक्ष्मी पार्क, नवी पेठ) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांची सासू सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात राहायला आहे. आनंदनगरमधील अपरानंद सोसायटीत त्यांचा बंगला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील कपाटातून सात हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक साळुंके तपास करत आहेत.
बिबवेवाडीत चंदन चोरी
बिबवेवाडी भागातील एका बंगल्यातून चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उत्कर्ष गजानन तांबे (वय ४९, रा. अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचा बिबवेवाडीतील अनिकेत सोसायटीत बंगला आहे. रविवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत. शहरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील सोसायटी, बंगले, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेली आहेत.