स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘मोपल्यांचे बंड, अर्थात मला काय त्याचे’ या पुस्तकावर आधारित ऑडिओ बुकचे प्रकाशन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते झाले.
‘मल्हार प्रॉडक्शन्स’ने या ऑडिओ बुकची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, हिंदू महासभेच्या हिमानी सावरकर, कॅप्टन नीलेश गायकवाड आणि ऑडिओ बुकचे निर्माते-दिग्दर्शक महेश लिमये या प्रसंगी उपस्थित होते. या ऑडिओ बुकमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
प्रवीण तोगडिया म्हणाले,‘‘आठ दशकांपूर्वी लिहिलेल्या या कादंबरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या काळच्या समाजस्थितीचे केलेले वर्णन आणि सध्याची परिस्थिती यामध्ये कोणताही फरक नाही. यामध्ये बदल घडविण्यासाठी हिंदू समाजाने योगदान दिले पाहिजे.’’
अजून पंतप्रधानपदाची शपथ देखील न घेतलेल्या पाकिस्तानच्या नवाझ शरीफ यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले. त्यावरून मैत्री कुणाशी करायची हे आपल्याला कळतच नाही का, असा सवाल शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. नीलेश गायकवाड, हिमानी सावरकर आणि महेश लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.